मुंबई : सणासुदीच्या दिवसात खवा, मावा, मिठाई, खाद्यतेल ,वनस्पती व तूप इत्यादी अन्न पदार्थाना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामध्ये भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनातर्फे अन्न आस्थापनेची तपासणी करायची विशेष मोहिम सुरु केली आहे. ही मोहिम डिसेंबरपर्यत राबविण्यात येणार आहे. त्यानुसार उत्पादकांपासून ते किरकोळ दुकानांची तपासणी करण्यात येणार आहे. ज्या मिठाईच्या दुकानांमध्ये अथवा उत्पादकांकडे कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन होत असल्याचे आढळून येईल ,त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिला आहेत.

सणासुदीच्या काळात उत्सावादरम्यान बाजारात विविध प्रकारच्या मिठाई विक्रीसाठी उपलब्ध असतात. यामध्ये मोठया प्रमाणात खवा, दूध, खाद्यतेल, तूप यापासून तयार होणारे अन्नपदार्थ उपयोगात आणले जातात. पण मागणी जास्त आणि आवक कमी अशी परिस्थिती असल्यामुळे या काळात भेसळ करण्याचे प्रकार केले जातात. त्यामुळे सणासुदीच्या काळात होणारे भेसळीचे प्रकार टाळण्यासाठी मिठाई विक्रेत्यांना काही मार्गदर्शन सूचना अन्न व औषध प्रशासनाने दिल्या आहेत,असे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले.

मिठाई ट्रे वर दर्शनी भागात वापरण्यायोग्य दिनांक टाकावा, अन्नपदार्थ तयार करताना उत्पादकाची जागा स्वच्छ व आरोग्यदायी असावी, अन्न पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल हा परवानाधारक अथवा नोंदणीधारक अन्न व्यवसायिकांकडून खरेदी करावा व त्यांची खरेदी बिले जतन करावीत, भांडी स्वच्छ व आरोग्यदायी झाकण असलेली असावीत ,अन्न पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा, अन्न पदार्थ स्वच्छ व सुरक्षित ठिकाणी साठवावेत, त्वचा संसर्गजन्य रोगापासून मुक्त याबाबत कामगारांची वैद्यकीय तपासणी करावी, मिठाई तयार करताना केवळ फूड ग्रेड खाद्यरंगाचा १०० पी.पी.एम च्या मर्यादित वापर करावा, दुधजन्य पदार्थाची मिठाचे सेवन त्वरित करण्याबाबत निर्देश देण्यात यावे,माशांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अन्नपदार्थ जाळीदार झाकणाने झाकून ठेवावे, अन्न पदार्थ तयार करताना वापरण्यात येणारे खाद्यतेल २-३ वेळाच तळण्यासाठी वापरण्यात यावे. नंतर वापरलेले तेल रुको अंतर्गत नेमण्यात आलेल्या एग्रीकेटर यांना देण्यात यावे आदी सूचनांचा समावेश आहे.
स्पेशल बर्फीचा वापर हा खवा किंवा मावा या अन्नपदार्थांना पर्याय म्हणून करु नये. विक्रेत्यांनी त्यांचे विक्री बिलावर यांचेकडील एस एस एस ए आय परवाना क्रमांक नमूद करावा ,विक्रेत्यांनी दूध, दुग्धजन्य पदार्थ, खवा ,मावा या नाशवंत पदार्थांची वाहतूक ही योग्य तापमानास व सुरक्षीतरित्या करण्यात यावी.

तरी ग्राहकांनी देखील जागृक राहून अन्न पदार्थाच्या गुणवत्ता दर्जाबाबत किंवा अन्न आस्थापनाबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्याबाबत सविस्तर माहिती प्रशासनाच्या १८००-२२२-३६५ या टोल फ्री क्रमांकावर
नोंदवावी असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!