उध्दव ठाकरेंचे पीए मिलींद नार्वेकर शिवसेनेचे सचिव
शिवसेनेला अच्छे दिन येणार का ?
संतोष गायकवाड
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलींद नार्वेकर यांची शिवसेनेच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आलीय. सेनेच्या अनेक घडामेाडीत मिलींद नार्वेकर हेच पडद्यामागचे नायक असायचे. आता सचिव पदाची जबाबदारी मिळाल्याने सेनेच्या कारभारात नार्वेकर प्रत्यक्ष सक्रीय होणार आहेत. नार्वेकरांच्या नियुक्तीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आतापर्यंत शिवसेनेला सोडचिठ्ठी देणा-यांनी मिलींद नार्वेकर यांनाच खलनायक ठरवलय होतं. मात्र नार्वेकरांच्या नियुक्तीने शिवसेनेला अच्छे दिन येणार का, असाच प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.
वरळी येथे शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली त्या बैठकीत अनेक नियुक्त्या करण्यात आल्यात. त्यातील एक महत्वाची नियुक्ती ठरलीय, ती मिलींद नार्वेकर यांची. शिवसेनेतील वादग्रस्त व्यक्तीमत्व म्हणूनच मिलींद नार्वेकर यांची ओळख आहे. शिवसेनेत अनेक घडामोडी होतात त्यात अदृश्य हात हा नार्वेकरांचाच असतो असेही म्हटले जाते. गटप्रमुख ते विभागप्रमुखांपर्यंतच्या नियुक्त्या असो, नेत्यांबरोबरची महत्त्वाची चर्चा असो की आर्थिक देवघेव, सा-याचा केंद्रबिंदू नार्वेकरच असतात हे अनेक वेळा उघड झालेलं आहे. बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून नार्वेकर हेच उपशाखाप्रमुखापासून ते विभाग संघटकापर्यंतची पदाची स्वत: नियुक्ती करीत असल्याचा सूर सेनेतून अनेकवळा ऐकायला मिळतो. नार्वेकर हे संघटनेत हस्तक्षेप करीत असल्योन अनेकवेळा त्यांच्याविषयी नाराजीची भावना उघड झालीय. उध्दव ठाकरेंना भेटायचे असेल तर त्या अगोदर नार्वेकरांना भेट घ्यावी लागते अशी सगळी परिस्थिती आहे. आता मात्र नार्वेकर यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी आल्याने यापुढं शिवसेनेत त्यांचा सक्रिय सहभाग दिसून येणार आहे. त्यामुळे त्यांचा फायदा राजकीय वर्तुळात शिवसेनेला होईल का हाच खरा प्रश्न आहे.
कोण आहेत मिलींद नार्वेकर
मिलींद नार्वेकर हे साधे शिवसैनिक हेाते. मालाडच्या लिबर्टी भागातले गटप्रमुख. 1992 च्या निवडणुकीआधी शाखाप्रमुख पद मिळाव यासाठी मिलींद नार्वेकर यांनी मातोश्रीची पायरी चढली. पण त्यानंतर ते मातोश्रीचेच झाले. हुशार स्मार्ट चुणचुणीत असलेले मिलींद नार्वेकर उध्दव ठाकरेंना भेटले, त्यावेळी उध्दव यांच्या नजरेत भरले. फक्त शाखाप्रमुख व्हायचं की आणखी काही जबाबदारी उचलायची तयारी आहे अस उध्दव ठाकरेंनी त्यांना त्यावेळी विचारल होतं. तेव्हा धोरणी मिलींदने तुम्ही सांगाल ते…अस पटकन उत्तर दिलं. आधी पडेल ती हलकी कामे त्यांनी केली. १९९२ च्या महापालिका निवडणुकीनंतर सेनेतील उध्दव ठाकरेंचे महत्व वाढत गेलं. त्यांची अपॉइंटमेंट घेणे, फोन घेण, डायरी मेंन्टेनट करणं, दौरे आखणे अशी कामे मिलींद नार्वेकर यांच्या गळयात पडली आणि ते उध्दव ठाकरेंचे पीए बनले. दिलेली जबाबदारी पार पडणारा, कधीच कोणत्याच गोष्टीला नाही न बोलणारा मिलींद नार्वेकर हे उध्दव यांच्या गळयातला ताईत बनले. उध्दव ठाकरेंचे अपॉइंटमेंट पीए या नात्याने मिलींद नार्वेकरच ठरवित असल्याने, मिलींदच्या विरोधातील धुसफूस वाढायला लागली. पण मिलींद नार्वेकर यांच्या विरोधात ब्र उच्चारायची कोणाची धमक नव्हती. उध्दव ठाकरेंनी शिवसेनेची धुरा सांभाळली तेव्हापासून शिवसेनेतून बाहेर पडणारा प्रत्येक नेता हा मिलींद नार्वेकर यांनाचा टार्गेट केलं. 2004 ला भास्कर जाधवांनी शिवसेना सोडताना पीए मिलींद नार्वेकर यांच्यावर तोंडसुख घेतल. मिलींदकडून शिवसेनेत आर्थिक व्यवहार होत असल्याचा घाणाघाती आरोप करीत नारायण राणेंनी शिवसेना सोडली. माझा विठ्ठळ बडव्यांच्या चांडाळ चौकटीत अडकला आहे अस सांगत राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केलं. तेव्हा त्यातला एक मिलींद नार्वेकर होते. माजी खासदार मोहन रावले यांनीही मिलींद नार्वेकर यांच्यावरच तोफ डागली. या सर्वांनी मिलींदला खलनायक म्हणून रंगवल. तरी शिवसेनेतील त्याची वट वाढतच गेली. मिलींद नार्वेकरांना आमदारकी, खासदारकी मिळणार इथपर्यंत चर्चा रंगली. इतक त्यांच प्रस्थ वाढत चाललय. एवढ सगळ होऊनही मिलींद नार्वेकरांचे मातोश्रीचे स्थान अढळच राहिलं. आता ते अधिकच घट्ट झालय. नार्वेकर यांच्या नियुक्तीने शिवसेनेला राजकारणात किती फायदा होतो हे काही दिवसातच दिसून येणार आहे.
—————-