आश्विन अमावास्येच्या, म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व मंदिरांत, दुकानांत, तसेच घराघरांत श्री लक्ष्मीपूजन केले जाते. आश्विन अमावास्येचा हा दिवस दीपावलीचा एक महत्त्वपूर्ण दिवस मानला जातो. सामान्यतः अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; परंतु दीपावलीतील ही अमावस्या शरद पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमेप्रमाणेच कल्याणकारी आणि समृद्धिदर्शक आहे. या दिवशी श्री लक्ष्मीपूजनासोबत अलक्ष्मी नि:सारणही केले जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करावयाच्या कृतीमागील शास्त्र सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखातून जाणून घेऊया.

1. इतिहास

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे.

2. सण साजरा करण्याची पद्धत

प्रातःकाळी मंगलस्नान करून देवपूजा, दुपारी पार्वणश्राद्ध अन् ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी लतापल्लवींनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, श्रीविष्णु इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा, असा लक्ष्मीपूजन या दिवसाचा विधी आहे.

लक्ष्मीपूजन करतांना एका चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. काही ठिकाणी कलशावर ताम्हण ठेवून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. लक्ष्मीजवळच कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवतात. त्यानंतर लक्ष्मी आदी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात. मग हातातील चुडीने पितृमार्गदर्शन करतात. ब्राह्मणांना आणि अन्य क्षुधापीडितांना भोजन घालतात. रात्री जागरण करतात.

लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध झाले नाही, तर जेवढे उपलब्ध आहे, त्या साहित्यात भावपूर्णरित्या पूजाविधी करावा. बत्तासे आदी साहित्य न मिळाल्यास, देवाला घरातील तूपसाखर, गूळसाखर किंवा एखादा गोड पदार्थ यांचा नेवैद्य दाखवावा.

लक्ष्मी कुणाकडे वास करते ?

आश्विन अमावास्येच्या रात्री जागरण करतात. पुराणांत असे सांगितले आहे की, आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जिथे स्वच्छता, शोभा आणि रसिकता आढळते, तिथे तर ती आकर्षित होतेच; शिवाय ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त, तसेच क्षमाशील पुरुष आणि गुणवती अन् पतिव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते.

3. लक्ष्मीपूजनाच्या दिवसाचे महत्त्व

सामान्यतः अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; पण त्याला अपवाद या अमावास्येचा आहे. हा दिवस शुभ मानला आहे; पण तो सर्व कामांना नाही; म्हणून या दिवसाला शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य !

4. श्री लक्ष्मीदेवीला करावयाची प्रार्थना

जमा-खर्चाच्या हिशोबाची वही लक्ष्मीसमोर ठेवायची आणि प्रार्थना करायची, ‘हे लक्ष्मी, तुझ्या आशीर्वादाने मिळालेल्या धनाचा उपयोग आम्ही सत्कार्यासाठी आणि ईश्वरी कार्य म्हणून केला आहे. त्याचा ताळमेळ करून तुझ्यासमोर ठेवला आहे. त्याला तुझी संमती असू दे. तुझ्यापासून मी काही लपवून ठेवू शकत नाही. जर मी तुझा विनियोग योग्य प्रकारे केला नाही, तर तू माझ्या जवळून निघून जाशील, याची मी सतत जाणीव ठेवतो. तेव्हा हे लक्ष्मीदेवी, माझ्या खर्चाला संमती देण्यासाठी भगवंताजवळ तू माझी शिफारस कर; कारण तुझ्या शिफारशीशिवाय तो त्याला मान्यता देणार नाही. पुढील वर्षीही आमचे कार्य सुरळीत पार पडू दे.’

5. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री केर का काढतात ?

अलक्ष्मी निःसारण

महत्त्व : गुण निर्माण केले तरी दोष नाहीसे झाले, तरच गुणांना महत्त्व येते. येथे लक्ष्मीप्राप्तीचा उपाय झाला, तसेच अलक्ष्मीचा नाशही झाला पाहिजे; म्हणून या दिवशी नवीन केरसुणी विकत घेतात. तिला ‘लक्ष्मी’ म्हणतात.

कृती : ‘मध्यरात्री नवीन केरसुणीने घरातील केर सुपात भरून तो बाहेर टाकावा’, असे सांगितले आहे. याला ‘अलक्ष्मी (कचरा, दारिद्र्य) निःसारण’ म्हणतात. एरव्ही कधीही रात्री घर झाडणे वा केर टाकणे करायचे नसते. फक्त या रात्री ते करायचे असते. कचरा काढतांना सुपे आणि दिमडी वाजवूनही अलक्ष्मीला हाकलून लावतात.

6. लक्ष्मीची पूजा करतांना अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक का काढावे ?

आश्विन अमावास्येच्या दिवशी केल्या जाणार्या श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. सर्व देवतांची पूजा करतांना त्यांना अक्षतांचे आसन दिले जाते. अन्य देवतांच्या तुलनेत श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व अक्षतांमध्ये 5 टक्के जास्त प्रमाणात आकृष्ट होते; कारण अक्षतांत श्री लक्ष्मीच्या प्रत्यक्ष सगुण गुणात्मक, म्हणजेच संपन्नतेच्या लहरी आकृष्ट करण्याची क्षमता असते. अक्षतांमध्ये तारक आणि मारक लहरी ग्रहण करून त्यांचे संचारण करण्याची क्षमता असल्याने लक्ष्मीची पूजा करतांना अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढावे. स्वस्तिकामध्ये निर्गुण तत्त्व जागृत करण्याची क्षमता असल्याने श्री लक्ष्मीच्या आसनाच्या स्वरूपात स्वस्तिक काढावे.

7. लक्ष्मी चंचल आहे, असे म्हणण्याचे कारण

एखाद्या देवतेची उपासना केली की, त्या देवतेचे तत्त्व उपासकाकडे येते आणि त्यानुसार लक्षणे दिसतात, उदा.श्री लक्ष्मीची उपासना केली की, धनप्राप्ती होते. उपासना कमी झाली, अहं जागृत झाला की, देवतेचे तत्त्व उपासकाला सोडून जाते. अशाच कारणांमुळे श्री लक्ष्मी उपासकाला सोडून जाते. तेव्हा स्वतःची चूक मान्य न करता व्यक्ती म्हणते, लक्ष्मी चंचल आहे. येथे लक्षात घेण्यासारखे सूत्र हे की, लक्ष्मी चंचल असती, तर तिने श्रीविष्णूचे चरण केव्हाच सोडून दिले असते. – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले

संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण साजरे करण्याच्या पद्धती’

संपर्क : 9920015949

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!