पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत होणार भूमीपूजन
कल्याण: ज्ञान आणि बुद्धीमत्तेच्या जोरावर जगात ज्ञानाचे प्रतिक अर्थात सिम्बल ऑफ नॉलेज म्हणून गौरवल्या गेलेले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती टिकवण्यासाठी कल्याण पूर्वेतील प्रभाग समिती ड कार्यालयाच्या आवारात भव्य स्मारक उभारले जाते आहे. त्याचा भूमीपूजन सोहळा मंगळवार,१२ एप्रिल रोजी होणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून हे स्मारक उभारले जात असून येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने स्मारकासाठी आवश्यक जागेचे खुप कमी वेळेत आरक्षण बदलण्यात आले होते. तर नगरविकास विभागाच्या माध्यमातून भरघोस निधीही उपलब्ध करून देण्यात आला होता. मंगळवारी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या स्मारकाचे भूमिपूजन पार पडेल.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारावा अशी कल्याण पूर्वेतील स्थानिक जनतेची मागणी होती. मात्र स्मारकाच्या उभारणीत अनेक तांत्रिक अडचणी होत्या. जागेचा प्रश्न, जागेवरील आरक्षणाचा मुद्दा अशा समस्यांमुळे स्मारकाची कोंडी झाली होती. विषयाची गुंतागुंत वाढत असतानाच स्थानिक शिवसेना पदाधिकारी, तत्कालिन नगरसेवक यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेत त्यांना याबाबत माहिती दिली. विषयाचे गांभीर्य ओळखून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तात्काळ कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत बैठकी घेतली. पुढे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत प्रसिद्ध रचनाकार अरूणकुमार यांना पाचारण करत खासदार डॉ. शिंदे यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली.
कल्याण पूर्वेतील नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याची मागणी होती. मात्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्याची संकल्पना मांडली. स्थानिकांनाही ही संकल्पना आवडली. त्यासाठी पुढे वेगाने प्रक्रिया सुरू झाली. कल्याण पूर्वेतील ड प्रभाग समिती कार्यालयाच्या जागेचे आरक्षण कार्यालयासाठी होती. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यात सातत्यपूर्ण पाठपुरवठा केल्याने अखेर 3 नोव्हेंबर 2021 रोजी दीपावलीच्या पूर्वसंध्येला नगर विकास विभागाने मौजे तिसगाव येथील ड प्रभाग कार्यालयात शेजारील एकूण 8100 चौरस मीटर जागेपैकी 1300 चौरस मीटर जागेचे आरक्षण बदलण्याचा शासन निर्णय जाहीर केला. आरक्षण बदलाची ही प्रक्रिया विक्रमी वेळेत पार पडली. यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यात जातीने लक्ष दिले. पुढे या स्मारकासाठीचा निधी 8.74 कोटींपर्यंत वाढवण्यात आला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्मारकाप्रती दाखवलेली आस्था आणि सातत्य यामुळे स्मारकाचा प्रश्न विक्रमी वेळेत मार्गी लागला.
कल्याण पूर्वेतील प्रभाग समिती कार्यालयाच्या आवारात उभे राहणारे हे स्मारक भव्य, दिमाखदार आणि प्रेरणादायी ठरणार आहे. स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे. सोबतच स्मारकात प्रसन्न उद्यानाची उभारणी केली जाईल. हजारो पुस्तकांचा संग्रह ठेवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना समजून घेण्यासाठी येथे भव्य ग्रंथालय उभे केले जाईल. डॉ. बाबासाहेब यांचा जीवनप्रवास, त्यांच्या आयुष्यातील महत्वाचे टप्पे, आंदोलन, चळवळी यांचे दर्शन देणाऱ्या छायाचित्रांचे स्वतंत्र दालन येथे असेल. दृक्श्राव्य माध्यमातून डॉ. आंबेडकर समजून घेण्यासाठी एक भव्य सभागृह येथे उभारले जाणार आहे. येत्या वर्षभरात या स्मारकाचे काम पूर्ण केले जाणार आहे.
येत्या मंगळवारी १२ एप्रिल रोजी नगरविकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या स्मारकाची पायाभरणी केली जाणार आहे. यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, तक्षशिला बुद्धविहाराचे डॉ आनंद महाथेरो ( भंतेजी ) आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.