पुण्यात जी-20 शिक्षण मंत्र्यांची बैठक संपन्न
पुणे : शिक्षणावर केवळ आपल्या संस्कृतीचा, पायाच उभा नाही, तर शिक्षण आपल्या मानवतेच्या भविष्याला आकार देणारे संरचनाकारही आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.पंतप्रधान मोदी यांनी आज पुण्यात झालेल्या जी-20 शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीला ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून संबोधित केले.
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली, जी-20 सदस्य देशांच्या शिक्षणमंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला जी-20 सदस्य देशांच्या मंत्र्यांसह 80 प्रतिनिधी, निमंत्रित देश आणि युनिसेफ, यूनेस्को तसेच ओईसीडी सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. मोदी यांनी एका संस्कृत श्लोकाचा दाखला देत, त्यांनी सांगितले की, “ खरे ज्ञान आपल्याला विनम्र बनवते, आणि विनम्रतेतून आपली पात्रता ठरते आणि त्या पात्रतेतून आपल्याला अर्थार्जन करता येते, आणि संपत्तीचा वापर करत आपण सत्कर्म केले तर आपल्या आयुष्यात त्यामुळे आनंद निर्माण होतो भारताने आता सर्वसमावेशक आणि सर्वांगीण शिक्षणाच्या प्रवासाकडे वाटचाल सुरु केली आहे, असे त्यांनी सांगितले. पायाभूत साक्षरता किंवा अक्षरओळख, युवकांचा पाया मजबूत करणारी असते आणि भारत त्याला आता तंत्रज्ञानाचीही जोड देत आहे, असे त्यांनी सांगितले.
ई-लर्निंगच्या पद्धतींचा अभिनव वापर करण्यावर त्यांनी भर दिला, आणि त्याचे उद्दिष्ट उत्तम प्रशासनासह, दर्जेदार शिक्षण देणे, हेच असले पाहिजे, असेही स्पष्ट केले. ह्या दिशेने केंद्र सरकारने हाती घेतलेल्या अनेक उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. त्यात, “स्टडी वेब्स ऑफ अॅक्टिव लर्निंग फॉर यंग अॅसपायरिंग माइंडस” किंवा ‘स्वयं’ ह्या ऑनलाईन शिक्षण मंचाचा त्यांनी उल्लेख केला. ह्या मंचावर इयत्ता नववी ते पदव्युत्तर स्तरापर्यंत विविध अभ्यासक्रम उपलब्ध असून विद्यार्थ्यांना दूरस्थ शिक्षण घेण्याची सोय उपलब्ध झाली आहे, त्यामुळे शिक्षणाची सहज उपलब्धता, समानता आणि उत्तम दर्जाचे सर्वांना शिक्षण यावर भर देण्यात यश आले आहे, असे ते म्हणाले.
34 दशलक्षाहून अधिक जणांची नोंदणी आणि 9000 हून अधिक अभ्यासक्रमांसह, हे एक अतिशय प्रभावी शिक्षण साधन बनले आहे,” असे पंतप्रधान पुढे म्हणाले. त्यांनी दूरस्थ शिक्षणाद्वारे शालेय शिक्षण देण्याचा उद्देश असणाऱ्या ‘डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग’ किंवा ‘दीक्षा पोर्टल’चाही उल्लेख केला. दिक्षा पोर्टलद्वारे 29 भारतीय आणि 7 परदेशी भाषांमध्ये शिक्षण घेता येते आणि या पोर्टलद्वारे आतापर्यंत 137 दशलक्षाहून अधिक जणांनी आपला अभ्यासक्रम पूर्ण केला आहे अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. आहेत. भारताला आपला हा अनुभव आणि संसाधने विशेषत्वाने ग्लोबल साऊथमधील देशांबरोबर सामायिक करण्यात आनंद वाटेल हे पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले.
शिक्षण आणि कौशल्य विकासात केलेली गुंतवणूक ही मानवतेच्या प्रगतीसाठी केलेली गुंतवणूक असल्याचे ते म्हणाले. ज्ञान, कौशल्ये तसेच सामाजिक-आर्थिक तफावत भरून काढण्यासाठी, नागरिकांना सक्षम करण्यासाठी आणि आयुष्यभर शिकण्याच्या संधींद्वारे अधिक न्याय्य आणि समृद्ध जगाला प्रोत्साहन देण्यासाठी जी-20 सदस्य आणि आमंत्रित देश एकत्र आले आहेत याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.