आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे आवाहन !
मुंबई, दि. २२ : गोवरच्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात यश येत आहे. येत्या काही दिवसांतच व्यापक सर्वेक्षण आणि लसीकरणाच्या माध्यमातून गोवर संसर्गावर पूर्ण नियंत्रण मिळविण्यात येईल. पालकांनी मुलांचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज येथे केले.
आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज गोवर प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी कस्तुरबा रुग्णालयात भेट देऊन रुग्णांची पाहणी केली. तिथेही त्यांनी वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टर यांच्याशी चर्चा केली सूचना दिल्या. मंत्रालयात झालेल्या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ संजीव कुमार, आरोग्य आयुक्त डॉ तुकाराम मुंढे, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉ. मीता वशी, डॉ. अरुण गायकवाड आदी उपस्थित होते.
डॉ. सावंत यांनी सांगितले की, मुंबई शहरातील ठराविक प्रभागातच गोवरचा संसर्ग आहे. या प्रभागात सर्वेक्षण करण्यात येत आहे. संशयित लक्षणं असणारे बालकांना दवाखान्यात दाखल करण्यात येत आहे. लसीकरणासाठी दररोज १४० आणि अतिरिक्त १५० सत्र आयोजित केली जात आहेत. लसीकरण करुन घेतले जावे यासाठी समुपदेशन केले जात आहे. त्यासाठी समाजातील काही प्रभावी व्यक्तिमत्त्वे, धर्मगुरू यांचे सहकार्य घेतले जात आहे.
गोवर प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी मुंबईतील प्रभागात विशेष कक्ष सुरू करण्यात आले आहेत. या कक्षात संपर्क साधल्यास रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येत आहे. काही शंका असल्यास आरोग्य कर्मचाऱ्यांकडून शंका समाधान करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले. येत्या काळात गोवरचा संसर्ग असलेल्या प्रभागात अतिरिक्त पथकामार्फत लसीकरण केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. बैठकीनंतर डॉ सावंत यांनी कस्तुरबा रुग्णालयात भेट दिली. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा यांची पाहणी केली. यावेळी डॉ. मंगला गोमारे, अधिक्षक डॉ. चंद्रकांत पवार यांनी माहिती दिली.
२० लाख घरांचे सर्वेक्षण
शून्य ते ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांमध्ये हा संसर्ग अधिक आहे. आतापर्यंत २० लाख नागरिकांच्या घरापर्यंत आरोग्य यंत्रणा पोहोचली आहे. संशयित रुग्ण शोधून, देखरेख ठेवणं आणि तातडीने उपचार उपलब्ध करण्यात देण्यात येत आहे. यामुळे गोवरची साथ राज्यात नियंत्रणात आणण्यात यश आलं आहे. लसीचा पुरवठा प्रचंड आहे, असं मंत्री सावंत यांनी सांगितलं.
आतापर्यंत १० बालकांचा मृत्यू
गोवरचा उद्रेक हा मुंबईत गोवंडीमध्ये ठाणे जिल्ह्यात भिवंडीत आणि नाशिक जिल्ह्यात मालेगावमध्ये गोवरचा उद्रेक झाला आहे. मुंबईत आतापर्यंत १० बालकांचा मृत्यू झाला आहे. गोवरचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारचे आरोग्य पथकही मुंबईत येऊन गेले. दाट लोकवस्ती, लहान घरात मुलांची अधिक संख्या, कुपोषण, लसीकरणाबाबत उदासीनता, अशा कारणामुळे गोवरचा संसर्ग वाढत असल्याचं सांगितलं जात.
हि आहेत लक्षणे
गोवर हा विषाणूंपासून होणारा संसर्गजन्य आजार आहे. गोवरचे विषाणू शिंकण्या किंवा खोकण्यातून हवेत पसरतात. गोवरची बाधा कोणत्याही वयोगटात होऊ शकते. तीव्र ताप, शरीरावर लाल पुरळ, सर्दी, खोकला, डोळे लाल होणे. सर्वसाधारणपणे अंगावर गुलाबी-लालसर पुरळ, ताप, खोकला, वाहणारे नाक आणि लालसर डोळे ही गोवरची लक्षणे आहेत.