डोंबिवली : येथील पूर्व भागातील नांदिवली रस्त्यावरील एका सोसायटीच्या तळ मजल्यावर असलेल्या गादी कारखान्याला शनिवारी दुपारी आग लागली. दुकानात कापूस, कापडाचे गठ्ठे असल्याने आगीने काही क्षणात रौद्ररूप धारण केले. गादी कारखाना आगीत जळून खाक झाला आहे.
नांदिवली रस्त्यावरील नवसंकल्प इमारतीच्या तळमजल्यावर व्यापारी गाळे आहेत. त्यामध्ये गादी, उशा तयार करण्याचा कारखाना आहे.आज दुपारी त्या गादी कारखान्यात अचानक आग लागली.आग लागताच आजुबाजुच्या व्यापाऱ्यांनी बादलीने पाण्याचा मारा करून आग विझविण्याचे प्रयत्न केले. परंतु आगीने रौद्ररुप धारण केले .तेव्हा स्थानिकांनी पालिका अग्निशमन दलाला कळविल्यानंतर काही वेळात जवान घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत कारखाना जळून खाक झाला होता. कारखान्याच्या दरवाजाजवळ असलेल्या गाद्या आणि काही कापडाचे गठ्ठे पादचारी, जवळच्या व्यापाऱ्यांनी ओढून बाहेर काढल्याने दुकानातील काही सामान वाचविण्यात यश आले.
अग्निशमन जवानांनी तात्काळ पाण्याचा मारा सुरू करून आग इतरत्र पसरणार नाही याची काळजी घेतली. आगीवर नियंत्रण आणले. आगीचे नेमके कारण अद्याप समजु शकलेले नाही. मात्र, शॉर्टसर्किटमुळेच आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केला आहे.