माथेरानमधील रोप-वेच्या मातीच्या परीक्षणासाठी उत्खनन : आशिया खंडातील सर्वात मोठा रोप वे

माथेरान (राहुल देशमुख): माथेरानमध्ये पर्यायी वाहतूक व्यवस्थेसाठी रोप-वे चे सोकारण्यात येत आहे. आशिया खंडातील सर्वात मोठा रोप वे असून याचे काम टाटा समूहाने हाती घेतले आहे. त्यासाठी मातीचे परीक्षण करण्यासाठी रोप -वेचा मुख्य थांबा असलेल्या माधवजी पॉईंट येथे उत्खननाचे काम वेगात सुरू करण्यात आलय. माथेरानच्या पायाभूत सुविधेसाठी आणि पर्यायी मार्ग उपलब्ध होणेकामी शासन दरबारी अनेकदा पाठपुरावा करून देखील ठोस उपाययोजना झाली नव्हती.त्यामुळे मागील काही काळात हॉटेल उषा एस्कॉटच्या मालकाने इथे रोप -वे सुरू होण्यासाठी केंद्र शासनापर्यंत पाठपुरावा केला होता.त्यानंतर स्थानिकांच्या सततच्या मागणीवरून अखेरीस अनेक अडचणींनंतर रोप-वे सुरू करण्यास केंद्र शासनाकडुन परवानगी प्राप्त झाल्यावर माथेरानमधील मुख्य थांबा असलेल्या नौरोजी उद्यानातील माधवजी पॉईंटच्या दर्शनी भागात मातीच्या परिक्षणासाठी उत्खनन सुरू केले आहे.

टाटा समूह रोप -वे बनविताना माथेरान नगरपालिकेची आणि वनविभागाची जागा व्यापणार आहेत. यामध्ये अनेक झाडांची कत्तल होणार आहे.त्याचप्रमाणे हेरिटेज असलेले माधवजी उद्यानातील बहुतांश जागा रोप -वे मधून उतरल्यावर पर्यटकांना वापरावी लागणार असून यातून उद्यानात फिरावयास आलेल्या अन्य पर्यटकांना सुद्धा त्रास सहन करावा लागणार आहे. या सर्वच जागेचा वापर करतांना नगरपालिकेस सुध्दा रोप -वेच्या माध्यमातून उत्पन्न प्राप्त व्हावे यासाठी मागील आघाडीच्या सत्ताधारी गटाने रोप-वेच्या  एकूण ऊत्पन्नावर पाच टक्के रक्कम नगरपालिकेस मिळावी असे या समुहाला सुचविले होते. तद्नंतर २०१६ ची निवडणुक पार पडल्यानंतर अपयशी ठरलेल्या आघाडीने निवडणुकी नंतरच्या आपल्याच उर्वरित काळात बैठक घेऊन  रोप-वेच्या माध्यमांतून २५% रक्कम नफ्यावर मिळावी असे जाहीर केले होते. तूर्तास तरी रोप-वे समूह एकूण उत्पन्नावर पाच टक्के रक्कम नगरपालिकेस देण्यास तयार आहेत परंतु नगरपालिकेने याबाबत अद्याप लेखी घेतलेले नसल्याने भविष्यात हा समूह यू टर्न्स सुद्धा घेऊ शकतो. त्यासाठी हॉटेल उषा एस्कोटचे मालक आणि टाटा समुहाकडुन एकूण नफ्यावर पाच टक्के रक्कम घेण्याऐवजी प्रत्येक प्रवासी  तिकिटावर दोन ते पाच टक्के रक्कम नगरपालिकेस मिळावी या लेखी मागणी केल्याचेही बोलले जातय.

लांबी१७०० मीटर आणि उंची अडीच हजार फुट
हा महत्वाकांक्षी प्रकल्प या पर्यटनस्थळाला नव्या उगमाकडे नेणारा असून पर्यटनाला चालना देणारा प्रकल्प ठरणारा आहे.दरम्यान या रोप-वे ने एकावेळेस ऐंशी पर्यटक येजा करू शकतात.आशिया खंडातील हा सर्वात मोठा रोप-वे बनणार असून याची लांबी १७०० मीटर आणि ऊची अडीच हजार फूट आहे.कर्जत -भूतीवली -गार्बट पठार मार्गे माधवजी पॉईंट पर्यंतच्या या दहा ते पंधरा मिनिटांच्या प्रवासांत पर्यटकांना विविध पॉईंटस् आणि निसर्गसौंदर्याने नटलेले  माथेरान न्याहळीत गाठता येणार आहे.
—————
माथेरानच्या विकासात्मक दृष्ट्या रोप -वे हा स्वागतार्ह प्रकल्प आहे.परंतु या प्रकल्पात प्रामुख्याने स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना कामासाठी प्राधान्य मिळाले पाहिजे. रोप-वे मुळे पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढणार असून, सर्वांच्याच  रोजगारात भर पडणार आहे. व्यवसाय वृद्धिंगत होऊन आपोआपच पर्यटनक्रांती पहावयास मिळेल.
( प्रेरणा प्रसाद सावंत -नगराध्यक्षा माथेरान नगरपालिका )
—————
आम्ही माधवजी पॉईंट येथे छोटे स्टॉल्स् लावून एकूण पाच ते सहा जण व्यवसाय करीत आहोत.यावर आमच्या कुटुंबाची गुजराण होत आहे.आमच्या स्टॉल्स् च्या जागेवर हा प्रकल्प उभा राहणार असून आम्ही पुरते बेरोजगार होणार आहोत.नगरपालिकेने तसेच रोप -वेच्या समूहाने आमच्यासाठी काहीतरी पर्यायी रोजगाराची अथवा यामध्ये कामाची व्यवस्था करावी.
(मयूर कदम – स्टॉल्स् धारक , माथेरान )
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!