माथेरानची लाडकी महारानी अखेर रुळावर
माथेरानकरांच्या आंदोलनांच्या पवित्र्याला अखेर यश !
कर्जत.(राहुल देशमुख ) : मुलभूत हक्क मिळत नसेल तर एक नैतिक जबाबदारी म्हणून अहिँसा मार्गाने केलेल्या आंदोलनाला नक्कीच यश प्राप्त होते याचा साक्षात प्रत्यय माथेरानच्या स्थानिकांना आलेला आहे.शुल्लक कारणावरून मिनिट्रेन मागील दीड वर्षांपासून बंद करण्यात आलेली आहे.माथेरानच्या बाबतीत रेल्वे प्रशासनाच्या नकारात्मक भूमिकेला ठेचुन त्यांना वठणीवर आणण्यासाठी समस्त माथेरानच्या नागरिकांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस पक्षाने घेतलेल्या आंदोलनास पूर्णतः पाठिंबा दर्शविल्यामुळेच रेल्वे प्रशासनाला नमते घ्यावे लागले आहे.मागील दीड वर्षांपासून विनाकारण बंद करण्यात आलेली माथेरानची लाडकी महारानी अर्थातच मिनिट्रेन सुरू करण्यास भाग पाडले आहे.रेल्वे प्रशासन माथेरानच्या बाबतीत निगरगठ्ठ बनले होते त्यांची ही मिनिट्रेन सेवा सुरू करण्याबाबतीत काहीच मानसिकता दिसत नव्हती.आणि नेरळ -माथेरान ट्रेन सुरू व्हावी ही सुद्धा कल्पकता नाही.परंतु जेव्हा दीड वर्षांत निवेदनाची खैरात करून देखील हे प्रशासन केवळ चालढकल करीत होते.ठेकेदार कामे करीत आहे.त्याची तिजोरी भरत आहे.आणि सुरक्षेचे कारण पुढे करून आपल्या पदाची अकार्यक्षमता रेल्वेचे निष्क्रिय अधिकारी दाखवित होते.
माथेरानचा शोध १८५० मध्ये लागल्यानंतर पुढील पन्नास वर्षे स्थानिकांनी प्रत्येक बाबीँसाठी संघर्षांमध्ये आपले जीवन व्यथित केले आहे.परंतु सद्यपिढी ही ब्रिटिश गुलामगिरी प्रमाणे वागणारी नसून अन्यायाच्या विरोधात वेळप्रसंगी बंड करणारी आहेत.हे स्थानिकांनी आज खऱ्या अर्थाने निदर्शनास आणून दिले आहे.
ही गाडी पुर्विप्रमाणे सुरू करावी यासाठी येत्या १ नोव्हेंबरला नेरळ येथे जाऊन रेल रोको करण्याचा इशारा दिल्यामुळे याची दखल रेल्वे प्रशासनाला घेणे भाग पडले आहे.याअगोदरच मावळचे खासदार श्रीरंग बारणेे यांनी सुद्धा संसदेत अनेकदा मिनिट्रेनच्या बाबतीत पोटतिडकीने बाजू मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे.सर्वपक्षीय मंडळींनी ,व्यापारी,दुकानदार ,सामाजिक संस्था,मंडळांचे अध्यक्ष ,विविध राजकीय पक्षांच्या नेते मंडळींनी तसेच एक सदस्य समितीचे अध्यक्ष जनार्दन पार्टें यांनी सुद्धा आपल्या परीने पत्रव्यवहार केलेले आहेत.परंतु रेल्वे प्रशासनाने कदापि इथल्या स्थानिक तसेच पर्यटकांबाबतीत गांभीर्याने घेतले नाही.शेवटी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळे रेल्वे प्रशासन झुकले आणि निदान अमनलॉज स्थानक ते माथेरान स्थानका दरम्यान शटल सेवा सुरू करण्यासाठी आज दि.२९ रोजी चाचणी घेण्यात आली.नेरळहून सकाळी दहा वाजता निघालेली मिनिट्रेन साडेबारा वाजता माथेरान स्थानकात पोहोचली.दीड वर्षानंतर आपल्याच लाडक्या राणीला नजरेत भरून पाहण्यासाठी नागरिकांसह पर्यटकांनी गर्दी करून मोबाईल मध्ये छायाचित्र काढण्यास तसेच गाडीत बसण्यासाठी स्थानिकांसह पर्यटकांना मोह आवरता आला नाही.यावेळी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत ,उपनगराध्यक्ष आकाश चौधरी,माजी नगराध्यक्ष अजय सावंत ,मनोज खेडकर ,विरोधी पक्ष नेते शिवाजी शिंदे ,माजी नगरसेवक प्रकाश सुतार यांसह सत्ताधारी गटाचे लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——–/
या गाडीची ही चाचणी घेत असूनअमनलॉज ते माथेरान दरम्यान काही अडथळे असल्यास त्याची तत्काळ दुरुस्ती करून लवकरच शटल सेवा सुरू करण्याबाबतीत निर्णय घेण्यात येणार आहे.(एस.गोयल -विभागीय मंडळ परिचालन अधिकारी , नेरळ )