माथेरानची महारानी आजपासून पर्यटकांच्या सेवेला
मिनिट्रेनसाठी सर्वपक्षीयांनी लावले अस्तित्व पणाला !
कर्जत( राहुल देशमुख) : माथेरानची महारानी ओळखली जाणारी मिनी ट्रेन आजपासून पर्यटकांच्या सेवेला सुरू झालीय. मिनिट्रेनचे कुणाला श्रेय मिळणार यासाठी कॉँग्रेस आघाडी आणि सत्ताधारी यांच्यात चुरस लागली होती.सत्ताधारी गटाने दीड वर्षांत आपल्या परीने शासन दरबारी पाठपुरावा केला होता.तर कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने सुद्धा लेखी निवेदनांसह आपली मिनिट्रेन विषयी कैफीयत संबंधित अधिकारी वर्गाकडे मांडली होती. मिनिट्रेनसाठी सर्वपक्षीयांनी लावले अस्तित्व पणाला लावले होते.
सकाळपासून अमनलॉज स्थानक तसेच माथेरान स्थानकात मिनिट्रेनच्या स्वागतासाठी सर्वपक्षीय मंडळी सज्ज झाले होते. सर्वच पक्षांमध्ये श्रेयासाठी चढाओढ निर्माण झाली होती. त्यामुळे रात्री पासुनच बॅनरबाजी करण्यात आली होती. सकाळी आठ वाजता नेरळहून निघालेली मिनिट्रेन साडेदहा वाजता माथेरान स्थानकात पोहोचली.यावेळी सत्ताधारी गटाने फटाक्यांच्या आतषबाजीने आणि पुष्पहार घालून ट्रेनचे स्वागत केले. माथेरान रेल्वेचे जनक सर आदमजी पिरभॉय यांनी १९०७ साली मिनिट्रेन सेवा सुरू केली त्यावेळेस एवढे छायाचित्रण झाले नसेल तेवढे मोबाईल कॅमे-यात फोटो काढले गेले आहेत.पर्यटकांनी सुद्धा मोबाईल कॅमे-यामध्ये ही गाडी कैद केली आहे.
सत्ताधारी गटाने मावळचे खासदार श्रीरंग बारणेे यांच्या माध्यमातून मिनिट्रेन लवकरच सुरू व्हावी यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते.तद्नंतर कॉँग्रेस आघाडीने शेवटचा पर्याय म्हणून नेरळ येथे रेल रोको केल्याशिवाय शासनाला पाझर फूटणार नाही ही बाब ओळखून १ नोव्हेंबरला रेल रोको करण्याचा रेल्वे प्रशासनाला इशारा दिल्यामुळे अखेरीस सर्वांच्या प्रयत्नांची दखल रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतल्यानंतर शटल सेवा पर्यटकांच्या दिमतीला सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे इथला व्यवसायाला चालना मिळणार आहे. पर्यटकांची स्वस्त प्रवासी वाहतूक होणार असल्याने त्यांनी .सुटकेचा निश्वास सोडला आहे. यावेळी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत ,उपनगराध्यक्ष आकाश चौधरी ,गटनेते प्रसाद सावंत तसेच सत्ताधारी गटाचे लोकप्रतिनिधी,मुख्याधिकारी डॉ.सागर घोलप, माजी नगराध्यक्ष अजय सावंत , मनोज खेडकर ,नगरसेवीका वर्षा रॉड्रीक्स विरोधी पक्ष नेते शिवाजीराव शिंदे ,मुस्लीम समाजाचे अध्यक्ष नासिर शारवान ,चर्मकार समाजाचे अध्यक्ष हेमंत पवार ,महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष सागर पाटील , माजी नगरसेवक प्रकाश सुतार यांसहविविध समाजाचे प्रमुख तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.