बच्चेकंपनीसाठी गोड बातमी.. मोराच्या बागेत धावणार माथेरानची मिनी ट्रेन !
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर होणार लोकार्पण
डोंबिवली : डोंबिवलीतील मोराची बाग म्हणून ओळखली जाणाऱ्या बागेत आता माथेरानची मिनी ट्रेन अवतरणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या नुतनीकरणाच्या कामाला चांगलाच वेग आला असून फेब्रुवारी महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे बच्चेकंपनीची आकर्षण असणारी ही मिनी ट्रेन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर धावणार आहे अशी गोड बातमी श्री गणेश मंदिर संस्थांनचे सदस्य प्रवीण दुधे यांनी दिली.
डोंबिवली पुर्वेतील श्री गणेश मंदिरा समोरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या नूतनीकरणाच्या कामाला चांगलाच वेग आला आहे. डोंबिवलीतील गणपती मंदिर संस्थांच्या वतीने हे काम सुरु आहे. या उद्यानातील मोराची बाग म्हणून ओळखली जाणाऱ्या बागेत आता माथेरानची मिनी ट्रेन अवतरणार आहे. फेब्रुवारीच्या महिना अखेरीस हे काम पूर्णत्वास यॆऊन येत्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या उद्यानाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या सुशोभिकरणाचे काम श्री गणेश मंदिर संस्थानच्यावतीने सुरू आहे. अंदाजे ९० लाखाहून अधिक खर्च या उद्यान सुशोभीकरणासाठी करण्यात येत आहे. यापूर्वीही गणपती मंदिराच्या वतीने महापालिकेचे आचार्य अत्रे ग्रंथालयही या संस्थांनाच्या माध्यमातून यशस्वीरीत्या सुरु आहे. हीच सामाजिक बांधिलकी जोपासत गणपती मंदिराच्या वतीने या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे . एकाच उद्यानात मुलांना अनेक सोयी उपलब्ध करून देण्यात याव्या असा संस्थानाचा मानस आहे. २८ हजार चौरस फूटाच्या उद्यानात मुलांसाठी माती, वाळू, रबर असे अनेक साहित्य वापरून मुलांसाठी खेळाचे साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच रंगीत कारंज, भिंतीवरून वाहणारा धबधबा अनेक छोट्या कार्यक्रमांसाठी अम्पी थिएटर बांधण्यात येणार आहे. व्यासपीठा समोर ५० ते ६० लोकांच्या बसण्याची आसनव्यवस्था असणार आहे. तसेच लहान मुलांना तेथून जाणारी लोकल ट्रेन पाहता यावी यासाठी बागेच्या कुंपणाभोवती संरक्षक जाळी उभारण्यात येणार आहे. वयोगटा नुसार खेळण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ३ ते १२ अशा निरनिराळ्या वयोगटापर्यंत खेळांची रचना करण्यात येणार आहे,
अशी असेल ट्रेन
चार डब्ब्यांची हि गाडी असेल जी माथेरानच्या मिनी ट्रेन सारखी दिसेल. ज्यामध्ये मुलांसोबत आई बाबांनाही बसता येईल तसेच या गाडीत एकावेळी १८ मुलं बसू शकतील अशी या गाडीची क्षमता असेल.. २५ मीटर बाय सात मीटर गोलाकार अशी मार्गिका असणार आहे.
——़——-
श्रुती देशपांडे़ – नानल (प्रतिनिधी) मो. ८३६९०५४१९२