माथेरानची मिनिबस शोभेपुरतीच ! स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष ; नागरिकांचा संताप
कर्जत : ( राहुल देशमुख) : “गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एस.टी. हे शासनाचे ब्रीदवाक्य माथेरानमध्ये फोल ठरल्याचे दिसून येते. चार दशकानंतर तत्कालीन नगराध्यक्ष मनोज खेडकर यांच्या प्रयत्नाने मिनिबस सेवेचे माथेरानकरांचे स्वप्न साकार झाले. पण वाढीव फेेऱ्याबाबत स्थानिक प्रशासनाने कायम दुर्लक्ष केले त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना काहीच उपयोग होत नाही त्यामुळे ही बस सेवा केवळ शोभे पुरती असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारी कर्जत -माथेरान बससेवा असून, एकेकाळी कर्जत आगार बंद होण्याच्या मार्गावर असतांनाच ११ ऑक्टोबर २००८ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी स्थानिक मंडळींना सोबत घेऊन अनेक संघर्षावर मात करीत माथेरानकरांचे स्वप्न पूर्ण केले होते. सध्यातरी ही बससेवा केवळ नावापूर्तीच उरल्याचे दिसून येतंय. बसच्या मर्यादित फेऱ्या तसेच शनिवार -रविवारी जेमेतेम तीन फेेऱ्या होत आहेत. नवीन दोन बसेस उपलब्ध असताना देखील एकच बस या मार्गावर सुरू ठेवण्यात आली असून, दूसरी बस कर्जत ते पनवेल फेऱ्या करीत आहे.
माथेरान गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर दस्तुरी नाका येथे बससाठी पायी प्रवास करावा लागतो त्यामुळे पहाटे कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अंधारातुनच जावे लागते. मुलींना खूपच त्रासदायक होत आहे.तर वयोवृद्ध मंडळी ,व्यापारी वर्ग यांना बस पकडण्यासाठी पायपीट करताना तारेवरची कसरत करावी लागते .यावर्षी पाच जणांना पायी प्रवास करताना हृदयविकाराने मृत्युला सामोरे जावे लागले आहे.हीच अवस्था नेरळ येथे सुद्धा पहावयास मिळत आहे.शासनाची ही बस एस.टी.स्टॅण्ड येथे असण्याची नितांत आवश्यकता असतांना नेरळच्या हायवेवर उभी करण्यात येते त्यामुळे नेरळ येथून सुद्धा बससाठी एक ते दीड किलोमीटर पुन्हा पायपीट करावी लागत आहे.याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. राजकीय पक्षांनी याकडे कानाडोळा केला असून नागरिकांनाही जणूकाय देने घेणे नाही असाच अविर्भाव दिसून येत आहे त्यामुळे राजकीय पक्षांच्या कारभारावर नागरिक नाराज आहेत. २००८ मध्ये मिनिबसच्या फेर्या वाढविण्याबाबत मनसेचे अध्यक्ष संतोष कदम नगरसेवक दिनेश सुतार यांनी आमरण उपोषण केले होते. त्यावेळेस आश्वासन देऊन प्रशासनाने थोड्या प्रमाणात तजवीज केली होती. पण त्यानंतर परिस्थिती जैसे थे आहे. मात्र आपल्या हक्कासाठी माथेरानकरा ना संघर्ष करावा लागत आहे.
—–
सध्या दोन नवीन बसेस उपलब्ध आहेत.परंतु या मार्गावर एकच बसचा वापर होत आहे.यामुळे जेष्ठ नागरिक ,विद्यार्थी यांना त्रास होत आहे.बसच्या फेर्या वाढवून उत्पन्नात भर पडण्यासाठी महामंडळाने प्रयत्न करावेत. (शिवाजी शिंदे -विरोधी पक्ष नेता माथेरान नगरपालिका)
नेरळ खांडा येथे अगोदर ही बस यायची परंतु वर्षभरापासुनच खांड्यात गाडी आणली जात नाही अन्य मोठ्या बसेस तिथे येतात केवळ माथेरानला जाणारी बस दूरवर हायवेला लागून उभी असते त्यामुळे प्रवाशांना नाईलाजाने खाजगी वाहनांचा वापर करावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. (प्रकाश सुतार – माजी नगरसेवक माथेरान)