माथाडी कामगारांच्या घरकुलांचा, दोन महिन्यात निर्णय
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : वडाळा आणि चेंबूर येथील माथाडी कामगारांच्या घरकुलांसंदर्भात येत्या दोन महिन्यात सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माथाडी कामगारांच्या शिष्टमंडळाला दिले. बुधवारी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करताना बोलत होते.
चेंबूर आणि वडाळा येथील माथाडी कामगारांच्या गृहनिर्माण संस्थेला चटई क्षेत्र वाढवून देण्याबरोबरच वाढीव चटई क्षेत्राच्या रकमेत सवलत देण्याबाबत निश्चित विचार करु. गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांची यादी करताना, माथाडी कामगारच असेल याची दक्षता घ्यावी. अन्य कोणी इतर संस्थेचा कर्मचारी, कामगार नसावा. माथाडी बोर्डात कामगारांच्या मुलांना नोकऱ्या देण्याबाबत कामगार मंत्र्यांशी बोलून निर्णय घेऊ, असेही मुख्यमंत्री म्हणाले. या बैठकीत माथाडी कामगार संघटनेतर्फे शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री निधीला 25 लाखांचा धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी आमदार नरेंद्र पाटील, शशिकांत शिंदे, माजी आमदार विजय सावंत, गुलाबराव जगताप, पोपटराव देशमुख सह अनेक माथाडी कामगार, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यु. पी. एस. मदान, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!