*हजारोंनी दिला साश्रूनयनाने निरोप*
*शहीद मेजर कौस्तुभ राणे अनंतात विलीन*

 

ठाणे दि ९: भारतीय सैन्य दलातील मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार राणे यांच्यावर आज शोकाकुल वातावरणात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते. यावेळी मीरा रोड, भाईंदर परिसरातील हजारो नागरिकांनी साश्रू नयनाने मेजर राणे यांना अखेरचा निरोप दिला.

मीरा रोड येथील जॉगर्स पार्क जवळील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर आज दुपारी १२.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. वडील प्रकाशकुमार यांनी त्यांच्या चितेला अग्नी दिला. प्रारंभी पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार राजन विचारे, आमदार नरेंद्र महेता, प्रताप सरनाईक, निरंजन डावखरे, रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी, तहसीलदार अधिक पाटील, सेना दलाच्या दक्षिण-पश्चिम कमांड आणि गढवाल रायफल्सचे लेफ्टनंट जनरल चेरीश मॅथसन, चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल सी फर्नांडीस, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रांजळ जाधव, मीरा भाईंदर महापौर डिंपल मेहता यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.

आज सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी मेजर राणे यांचे पार्थिव मीरा रोड मधील शीतल नगर येथील त्यांच्या हिरल सागर या इमारतीत आणण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिकांनी “अमर रहे, अमर रहे,कौस्तुभ राणे अमर रहे” च्या घोषणा दिल्या. सकाळी पावणे  आठ वाजता त्यांचे पार्थिव इमारतीच्या खाली नागरिकांना अंत्यदर्शनासाठी ठेवण्यातआले होते. यावेळी परिसरातील नागरिकांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठी रांग लावली होती.

सकाळी साडे नऊच्या सुमारास मेजर कौस्तुभ राणे यांचे तिरंग्यात लपेटलेले पार्थिव फुलाने सजवलेल्या लष्कराच्या वाहनात ठेवून अंत्ययात्रा सुरू झाली.  यावेळी नागरिकांनी “जब तक सूरज चांद रहेगा कौस्तुभ तेरा नाम रहेगा, वंदे मातरम- भारत माता की जय अशा घोषणा देऊन परिसर दुमदुमून टाकला. यावेळी अंत्ययात्रेत पालकमंत्री एकनाथ शिंदे स्वत: सहभागी झाले होते.

मेजर राणे यांच्या मातोश्री ज्योती, पत्नी कनिका, मुलगा अगस्त्य, बहिण कश्यपी यांनी स्मशानभूमीत अखेरची श्रध्दांजली वाहिली त्यावेळी भावनाविवश नागरिकांनी “भारतमाता की जय, माँ तुझे सलाम अशा जोरदार घोषणा दिल्या. यावेळी लष्कराच्या वतीने गोळीबाराच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!