इंफाळ : दहावीच्या परीक्षेसाठी या वर्षीपासून पारंपरिक गुणदान पध्दतीऐवजी श्रेणी पध्दतीचा अवलंब करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मणिपूर सरकारने घेतला आहे.
या नव्या पध्दतीमध्ये विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर (लिव्हिंग सर्टिफिकेट) मात्र श्रेणीचा उल्लेख केला जाणार नाही,असे मणिपूरच्या शिक्षण विभागाचे सहसचिव एलांगबाम सोनिया यांनी जारी केलेल्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.
नव्या श्रेणी पध्दतीत विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रामध्ये गुणांचा किंवा श्रेणीचा उल्लेख नसेल. केवळ पास किंवा नापास एवढाच उल्लेख असेल, असे या परिपत्राकामध्ये म्हटले आहे. ९१ ते १०० गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना ए-१ , ८१ ते ९० गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना ए-२ अशी श्रेणी दिली जाईल. तर २१ ते ३० गुणांसाठी ई-१ ही श्रेणी दिली जाईल. ई-१ ही श्रेणी मिळालेला विद्यार्थी नापास असेल.