झेंडुचा भाव गडगडला आणि त्याने उभ्या पिकावर नांगर फिरवला
वाडा – अत्यंत मेहनतीने विविध पिकांची शेती करणारे वाडा तालुक्यातील मौजे पिक येथील शेतीनिष्ठ शेतकरी मोहन एकनाथ पाटील यांचा यावर्षी फुलशेतीने पुर्णतः भ्रमनिरास केला आहे. झेंडुचा भाव गेल्या पंधरा दिवसांपासून अत्यंत गडगडल्याने व झेंडू काढण्यासाठी येणारा मजुरी खर्चही परवडत नसल्याने मोहन पाटील याने आपल्या साडेतीन एकर जमीनीत तयार झालेल्या झेंडू पिकावर आज नांगर फिरविला.
मोहन पाटील हे गेली अनेक वर्ष टाँमेटो,वांगी,मिरची, कारली,दुधी,काकडी, कांदा अशी विविध प्रकारची भाजीपाला शेती करतात. यावर्षी त्यांनी या भाजीपाला शेतीला बगल देऊन प्रथमच साडेतीन एकर जमिनीत दिड लाख रुपये खर्च करून झेंडुची लागवड केली. झेंडुचे पिक तयार झाल्यानंतर सुरवातीला आठ दिवस तिस रुपये प्रति किलो भाव मिळाला. त्यानंतर हा भाव दररोज कमी- कमी होत तो आता अवघा सहा ते सात रुपये प्रति किलोवर आला. दररोज ८ ते १० क्विंटल झेंडू काढण्यासाठी व तो बाजारात पोहचविण्यासाठी ९ ते १० हजार रुपये खर्च होत होता.आणि प्रत्यक्ष उत्पन्न ६ ते ७ हजाराचे मिळत होते.
मोहन पाटील यांच्या घराशेजारीच साडेतीन एकरमध्ये असलेली पिवळा व लाल झेंडुची बहरलेली शेती पाहाण्यात एक वेगळाच आनंद मिळत होता. मात्र या झेंडुच्या शेतीतून दररोज तीन ते चार हजाराचा होणाऱ्या तोट्यांनी त्यांची झोपच उडाली होती. झेंडुचा भाव वाढण्याची चिन्हे दिसत नसल्याचे पाहुन पाटील यांनी आज सकाळीच बहरलेल्या आपल्या झेंडुच्या शेतीमध्ये नांगरधारी ट्रक्टर घातला व संपूर्ण शेतीत झेंडुचे बहरलेले पिक उखडून टाकले.