छत्रपती संभाजीनगर, 29 एप्रिल : बीडमधील परळी आणि अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना धक्का बसला आहे. अंबाजोगाई बाजार समितीत 18 पैकी 15 जागांवर धनंजय मुंडे यांचे समर्थक उमेदवार विजयी झाले आहे. दणदणीत विजय मिळवून धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई बाजार समिती आपल्या ताब्यात घेतली आहे. महाविकास आघाडीचा हा मोठा विजय झाला. तर भाजपच्या पंकजा मुंडे यांना अवघ्या तीनच जागांवर विजय मिळाला आहे. बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आ. संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना मात देत 18 पैकी 15 जागा निवडून आणल्या आहेत, या विजयाने जयदत्त क्षीरसागर यांची 35 वर्षांपासूनची सत्ता पालटली असून, मविआच्या सर्वांनीच जल्लोष केला आहे.

नांदेडमध्ये अशोकराव चव्हाणच

भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेसची सत्ता कायम. 18 पैकी 15 जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस विजयी. काँग्रेसच्या खात्यात 13 तर 2 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस विजयी. निवडणुकीत खा. प्रताप पाटील चिखलीकर यांना धक्का बसला. यासह कुंटूर, हिमायतनगर, नायगाव या बाजार समित्याही काँग्रेच्या ताब्यात राहिली आहेत. भाजप आणि शिंदे गटाला या ठिकाणी काँग्रेसची सत्ता मोडीत काढणे शक्य झाले नाही. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे पुन्हा नांदेडमध्ये एकहाती वर्चस्व सिद्ध झाले आहे.

छत्रपती संभाजीनगरात महायुती

छत्रपती संभाजीनगरच्या बाजार समिती निवडणुकीत माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपच्या पॅनलने येथे दणदणीत विजय मिळविला. जिल्ह्यातील कन्नड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना धक्का बसला. हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना जाधव आणि शिंदे गटाचे नितीन पाटील यांच्या शिवशाही शेतकरी विकास पॅनलने पंधरा पैकी पंधरा जागा जिंकत मारली बाजी. वैजापूर बाजार समितीत शिवसेना आ. रमेश बोरनारे यांच्या पॅनलने विजय मिळविला.

लातुरात काँग्रेस-भाजप समान

भाजप आमदार रमेश कराड यांनी लातूर कृषी बाजार उत्पन्न समितीच्या निवडणूकीत काँग्रेसला मोठे आव्हान दिल्यानंतर भाजपमधील राजकारण चांगलेच तापले होते.18 जागा खेचत काँग्रेसने एकहाती विजय मिळवला आहे. यासह चाकूर बाजार समितीत भाजप, उदगीरला महाविकास आघाडी, औसा बाजार समिती भाजपकडे गेले आहे. अशा प्रकारे लातूरमधील चार पैकी दोन बाजार समित्या महाविकास आघाडीकडे तर दोन भाजपाकडे गेल्या आहेत. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर देशमुख कुटूंबीयाने एकहाती सत्ता मिळविली आहे.

धाराशिवमध्ये मंत्री सावंतांना धक्का

बाजार समितीच्या निकालात धाराशिव जिल्ह्यातील मतदार संघातील केवळ भूम बाजार समितीवर वर्चस्व राखण्यात आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांना यश आहे. परांडा आणि वाशी बाजार समिती या महाविकास आघाडीच्या ताब्यात गेल्याने तानाजी सावंताना हा मोठा धक्का मानला जात आहे. आमदार ज्ञानराज चौगुले हे उमरगा मतदार संघातून सलग ३ वेळा आमदार झाले आहेत. असे असताना देखील उमरगा, मुरुम बाजार समितीवर पकड मजबूत करु शकले नाही असे आजच्या निकालातून स्पष्ट होत आहे. सावंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मंत्री म्हणून ओळखले जातात. जगजीत राणा निबाळकर यांनी मात्र आपल्या भागातील समित्या राखल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *