मुंबई, दि. २५ः मुंबईतील नव्या इमारतीत मराठी माणसांना ५० टक्के आरक्षण देण्याच्या खासगी विधेयकावरून सत्ताधारी पक्षाने शिवसेनेवर (ठाकरे) टीकास्त्र सोडले. शिवसेनेची (ठाकरे) खासगी विधेयकाची मागणी म्हणजे ब्लॅकमेल आणि खंडणी वसूलीचा डावा असल्याचा आरोप शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. तर भावनिक राजकारण करून ठाकरेंनी मराठी माणसांना फसवल्याचा आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला. मराठी माणसाच्या मुंबईतील घरांवरून यामुळे चांगलीच जुंपल्याचे दिसून येत आहे. 

शिवसेनेचे (ठाकरे) उमेदवार अनिल परब यांनी मराठी माणसांसाठी ५० टक्के घरांचे आरक्षण मिळावे, या संदर्भात खासगी विधेयक आणावे, अशी मागणी केली. कायंदे यांनी यावर टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी शिवसेनेची स्थापन करण्याबरोबरच स्थानीय लोकाधिकार समितीची चळवळ उभी केली. त्यांचे विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांनी २५ वर्ष मुंबई महापालिकेची सत्तेत असताना मराठी माणसासाठी काहीच केले नाही. परिणामी मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला, असे सांगत विधान परिषद निवडणुकीपूर्वी नव्या विधेयकाची मागणी म्हणजे, बिल्डरांना ब्लॅकमेल आणि त्यांच्यावर दबाव टाकून खंडणी वसूल करण्याचा उद्देश असल्याचे म्हटले. उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब ठेवण्यासाठी सचिन वाझे या पोलीस अधिकाऱ्याला हाताशी धरून खंडणीचे रॅकेट चालवले. मविआ सरकारच्या काळात मातोश्री-२ बांधले. पत्रा चाळ पुनर्विकासात मोठा आर्थिक घोटाळा करुन शेकडो मराठी कुटुंबांना रस्त्यावर आणले. त्यावेळी मराठी माणसाची आठवण झाली नाही, का असा सवाल उपस्थित केला. कोणत्या कायद्याखाली मराठी माणसाला ५० टक्के घरे राखीव ठेवणार, याचे परब यांनी स्पष्टीकरण द्यावे, असे आवाहन केले.

मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला जावा, हे काँग्रेसचे स्वप्न आहे. ठाकरे हा अजेंडा पुढे नेत आहेत. धारावीत ३० ते ३५ टक्के मराठी कुटुंब राहतात. धारावीचा प्रोजेक्ट कसा थांबेल, यासाठी काँग्रेसच्या स्थानिक आमदारांनी प्रयत्न केले. याउलट महायुती सरकारकडून मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना दिली. या पुनर्विकासात मराठी माणसांना १०० टक्के घरे देण्यास सरकार कटिबद्ध आहे. मराठी माणूस टिकून राहावा म्हणून ठाण्यात क्लस्टर डेव्हलपमेंटसारखे प्रोजेक्ट राज्य सरकार वेगाने राबवत असल्याचे कायंदे म्हणाल्या.

ठाकरेंनी मराठी माणसाला फसवले – आशिष शेलार
महाविकास आघाडीचे सरकारच्या काळात बिल्डरांना तब्बल ५० टक्के प्रिमियम माफ केले. पत्रा चाळीतील मराठी माणसाच्या घरांत कट कमिशन खाल्ले. मुंबई महापालिकेत २५ सत्ता असूनही मराठी माणसांंच्या घरांसाठी काहीच केले नाही. आता लोकसभेत मराठी माणसांने दणका दिल्यानंतर त्यांची आठवण झाली का, असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी विचारला. मराठी माणसांच्या आडून हिरव्यांना घुसवायचे आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. गिरणी कामगारांना भाजपने घरे मिळवून दिल्याचा दावा त्यांनी केला. कागदावर भावनेचे घोडे कागदावर नाचवून ठाकरेंनी मराठी माणसाला वर्षानुवर्षे फसवले, असा आरोप शेलार यांनी केला.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *