सोशल मिडीयाद्वारे मराठी चित्रपटांचे प्रमोशन व्हावे – विनोद तावडे

मुंबई : मराठी चित्रपटांच्या कथेमध्ये दम आहे, याचे सादरीकरण व्यवस्थित व्हावे. मराठी चित्रपटाचे कथानक देश-विदेशातील निर्मात्यांना आकर्षित करीत आहे. तंत्रज्ञानाच्या जमान्यात आता मराठी चित्रपटांचे प्रमोशन सोशल मिडीयाद्वारे व्हावे, असे मत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले. सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणाऱ्या दर्जेदार मराठी चित्रपट निर्मिती अर्थसहाय योजनेच्या धनादेश वाटप कार्यक्रमाप्रसंगी तावडे निर्मात्यांशी बोलत होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य विभागाचे सहसचिव संजय भोकरे, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालिका जयश्री भोज, सहव्यवस्थापकीय संचालक प्रताप आजगेकर, डॉ. विकास नाईक आदींसह विविध निर्माते उपस्थित होते.

मराठी चित्रपटांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शासन दर्जेदार चित्रपट निर्मिती करणाऱ्यांना अर्थसहाय करते. मात्र हे पैसे आता चेकऐवजी ऑनलाईन नेटबँकिंगद्वारे (आरटीजीएस) देण्याची सोय व्हावी, अशी अपेक्षा तावडे यांनी व्यक्त केली. . तावडे यांनी निर्मात्यांना शासनाकडून काय अपेक्षा आहेत, याची माहिती जाणून घेतली. काही निर्मात्यांनी मराठी चित्रपटांना प्रदर्शनासाठी चित्रपटगृह उपलब्ध होत नसल्याची माहिती दिली, यावर तावडे यांनी दक्षिणेतील निर्मात्यांसारखे मराठी निर्मात्यांनी मजबूत संघटन करावे. तारीख निश्चित करून तो प्रदर्शित करावा, शासन त्यांच्या पाठिशी राहिल, असेही सांगितले. चित्रपटामध्येही सध्या स्पर्धा आली आहे, यामुळे एकाचवेळी तीन-चार मराठी चित्रपट प्रदर्शित होणार नाहीत, याची काळजी निर्मात्यांनी घ्यावी, असेही तावडे यांनी सांगितले.

तावडे यांच्या हस्ते तीन ‘अ’ दर्जा (40 लाख रूपये) व 20 ‘ब’ दर्जाच्या (30 लाख रूपये) मराठी चित्रपट निर्मात्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.
‘अ’ दर्जाप्राप्त मराठी चित्रपट व संस्था अशा- कॉफी आणि बरचं काही (मे. मोशनस्के एंटरटेनमेंट), नटसम्राट-असा नट होणे नाही (मे. फिनक्राफ्ट मिडीया अड एंटरटेनमेंट प्रा.लि.) आणि किल्ला( मे. एम.आर. फिल्म वर्क्स)  ‘ब’ दर्जाप्राप्त मराठी चित्रपट व संस्था अशा- झपाटलेला-2 (मे. कोठारे अड कोठारे व्हिजन), सामर्थ्य वंशाचा दिवा ( स्वयंभू प्रॉडक्शन), सिद्धांत (मे. नवलखा आर्टस व होली बेसिल कम्बाईन), जाणिवा (मे. ब्ल्यू आय प्रॉडक्शन प्रा. लि.), मनातल्या उन्हात (मे. आनंद सागर प्रॉडक्शन हाऊस), शॉर्टकट-दिसतो पण नसतो (मे. एम.के. मोशन पिक्चर्स), अथांग (मे. एका मल्टा व्हेंचर प्रा.लि.), ओळख (मे. लेहर एंटरटेनमेंट), मामाच्या गावाला जाऊया (मे. पंकज छल्लानी फिल्मस् ), निळकंठ मास्तर (मे. अक्षर फिल्म प्रा. लि.), कॅरी ऑन मराठा( मे. नंदा आर्टस), शटर (मे. सिलीकॉन मिडीया), बाय गो बाय (मे. आर.एस. सिनेव्हिजन), 7 रोशन व्हिला (मे. अभिप्रिया प्रॉडक्शन), सरपंच भगीरथ (मे. शिवकुमार लाड प्रॉडक्शन), लाठी (मे. स्टार तलाश प्रमोशन्स प्रा.लि.), पोश्टर गर्ल (मे. चलो फिल्म बनाये प्रॉडक्शन), ते दोन दिवस (मे. शिवसाई एंटरटेनमेंट), चिरंजीव (मे. मुंबई सिने इंटरनॅशनल) आणि डबलसीट (मे. ह्युज प्रॉडक्शन).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!