रोजगार मागणारे नको तर रोजगार निर्माण करणारे व्हा !
‘मराठी बिझनेस एक्सचेंज’ रंगणार ठाण्यात
ठाणे : उद्योगविश्वातील बहुचर्चित ‘मराठी बिझनेस एक्सचेंझ- पर्व २ रे’ हे दोन दिवसीय उद्योजकीय प्रदर्शन यंदा ठाण्यात रंगणार आहे. ९ व १० नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ दरम्यान ठाण्यातील टीप टॉप प्लाझा येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलय. मराठी उद्योजक आणि व्यावसायिकांकरिता सशक्त व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने हे उद्योजकीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ऍण्ड ऍग्रीकल्चर चे अध्यक्ष संतोष मंडलेचा, मसाला किंग धनंजय दातार, ऍडगुरु भरत दाभोळकर, युवा नेते आणि शिवम कन्स्ट्रक्शनचे संचालक वरुण सरदेसाई मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
गेल्या वर्षी नेहरु सेंटर येथे मराठी बिझनेस एक्सचेंझचा पहिला उद्योजकीय प्रदर्शन यशस्वी पार पडला. विविध उद्योजकिय विषयांच्या अनुषंगाने आयोजित केलेले परिसंवाद, त्या परिसंवादास उद्योगजगतातील दिग्गजांनी केलेले मार्गदर्शन, कथन केलेले स्वानुभव, विविध उद्योगांचे प्रदर्शन, विविध क्ष्रेत्रातील व्यावसायिक-उद्योजकांचे बिझनेस नेटवर्किंग यामुळे हे उद्योजकीय प्रदर्शन उद्योजकीय वर्तुळात कमालीचे गाजले.यावर्षी देखील असेच आगळेवेगळे परिसंवाद आयोजित केले जाणार आहेत.एखादा व्यवसाय सुरु केल्यानंतर त्या व्यवसायाचा ब्रॅण्ड कसा तयार करायचा, विक्री आणि विपणनच्या सहाय्याने उद्योग कसा वाढवावा, फिटनेस क्षेत्रातील उद्योगसंधी, खाद्य व शीतपेय उद्योगक्षेत्रातील वाव त्याच प्रमाणे सौर ऊर्जा, कापड उद्योग, सौंदर्यप्रसाधने उद्योग क्षेत्र, व्यवसायातील आर्थिक स्त्रोत आणि व्यवसायाकरीता अर्थपुरवठा, स्टार्ट अप, शेअर बाजारातील गुंतवणूक या सर्व विषयांच्या अनुषंगाने परिसंवाद होणार आहेत. या परिसंवादास प्रसिद्ध ऍडगुरु भरत दाभोळकर, सेंट ऍंजेलोजचे अध्यक्ष राजेश अथायडे, ‘तळवलकर्स’चे संचालक मधुकर तळवलकर, गोवा पोर्तुगिझाचे सुहास अवचट, प्रसिद्ध शेफ तुषार देशमुख, सॅमसोनाईटचे व्यवसाय विकास विभागाचे संचालक नरेन्द्र प्रताप सिंग, येस बॅंकेचे महाव्यवस्थापक प्रविण राऊत, जनकल्याण सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष संजय केळकर, डॉक्टर त्वचाचे संस्थापक डॉ. अमित कारखानीस आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत, सोहळ्यादरम्यान होणाऱ्या उद्योजकीय प्रदर्शनात विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत.
उद्योग शिका आणि उद्योगाचा विस्तार करा हे एमबीएक्स चे बोधवाक्य आहे. कोणता उद्योग कसा सुरु करावा, त्यासाठी भांडवल कसे उभारावे अशा स्वरुपाचे विषय उद्योजक होऊ पाहणाऱ्या तरूणास अत्यंत महत्वाचे आहेत. तसेच उद्योगाचा विस्तार करू पाहणाऱ्या उद्योजकांसाठी देखील हे परिसंवाद लाभदायक ठरणार आहेत. हा कार्यक्रम सर्व उद्योजक व उद्योजक होऊ पाहणाऱ्या तरुणांसाठी मोफत आहे. जागा मर्यादित असल्याने नावनोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणीसाठी www.marathibx.com या संकेतस्थळावर संपर्क साधावा. मराठी तरुणांनी या सोहळ्याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप ऍण्ड एक्सलन्स हे सहप्रायोजक आहेत. तसेच मी उद्योजक नेटवर्किंग पार्टनर, इमेज कन्सल्टन्ट हे इमेज पार्टनर आणि मुंबई लाईव्ह हे डिजीटल पार्टनर आहेत.