बदलापूरात मराठा महोत्सवाची धूम , सात दिवस विविध कार्यक्रमाचं ओयाजन
बदलापूर : बदलापूरमध्ये प्रथमच सात दिवस “मराठा महोत्सव 2018” चे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्र ते छत्रपती शिवाजी महाराज जयंती असे सात दिवस हा महोत्सव भरलाय. महाशिवरात्रीला सुरूवात झाली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कृषी तज्ज्ञ बुधाजी मुळीक, नितीन चंद्रकांत देसाई, फ्लॅगमन राकेश बक्षी आणि उद्योजक दीपक निंबाळकर यांच्या हस्ते या महोत्सवाचे शानदार उदघाटन पार पडल. शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शिवाजी चौक ते क्रीडा संकुल अशी भव्य रॅली काढण्यात आली.
स्वराज्य प्रतिष्ठान व मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज बदलापूर यांच्या वतीने तालुका क्रीडा संकुल, कार्मेल हायस्कुल जवळ, बदलापूर पूर्व येथे मराठा महोत्सव 2018 च आयोजन करण्यात आला आहे. आयोजक कालिदास देशमुख, आशिष गायकवाड, संतोष रायजाधव, जितेंद्र पाटील, सुनील पाटील, अरुण चव्हाण, हेमंत यशवंतराव, विश्वनाथ पोखरकर, गजानन पाटील, एन. डी.पाटील आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई त्यांच्या संकल्पनेतून महोत्सवाची सजावट करण्यात आली आहे. 19 फेब्रुवारीपर्यंत सात दिवस रोज सायंकाळी चार ते रात्री दहा पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलय. सात दिवस चालणाऱ्या या मराठा महोत्सवात ढोल पथक, शिवरायांचा पोवाडा, कलारंग, शिवभूषण काव्यकथन, होम मिनिस्टर, शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, शिवचरित्र, आश्रम शाळेतील मुलांचे कला सादरीकरण, पत्रकारांच्या न्यूज लेस कविता, युवारंग अशी विविधरंगी मेजवानी मिळणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या आयोजकांनी दिली.
सर्व धर्म समभावाचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला आहे तो विचार आपण अशा महोत्सवाच्या माध्यमातून पुढे नेत आहोत. शिवाजी महाराजांचा इतिहास भावी पिढीसमोर नेण्या साठी सकल मराठा समाजातर्फे अशा महोत्सवाचे प्रथमच आयोजन करीत आहे त्याबद्दल आयोजकांचे करावे तितके कौतुक कमी असल्याचे सांगून पुढील वर्षी यापेक्षाही भव्य प्रमाणात महोत्सवाचे आयोजन करावे त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करू असे आश्वासन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या मनोगतात दिले.
सरसंघचालक मोहन भगवंतांच्या वक्तव्याचा समाचार घेतांना कृषिमित्र बुधाजी मुळीक म्हणाले आम्ही संघाच्या हातात हात घेऊन जाण्यास तयार आहोत मात्र त्यांनी आम्ही सांगतो त्याप्रमाणे वागावे. महिलांवरील होणारे अत्याचार, शेतकऱ्यांवर होणारे अन्याय गारपीट, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, शेतकऱ्यांना पेन्शन आदी साठी मोहन भागवतांनी पुढाकार घ्यावा आम्ही त्यांना सहकार्य करण्यास तयार आहोत. शासन त्यांनी पाठीशी उभे करावे. त्यासाठी लागणारा निधी उभारण्यासाठी भागवतांनी राष्ट्र्पतींपासून लोकप्रतिनिधींपर्यंत सर्वाना दहा टक्के मानधन घेण्यासाठी आवाहन करावे अशी सूचनाही मुळीक यांनी केली.
मराठ्यांना आवाहन करताना मुळीक म्हणाले आपण मराठ्यांसारखे वागा. अन्याय, अत्याचार भ्रष्टाचार,व्यभिचार होत असेल तर स्वतःला मराठा म्हणू नका.ज्याचे मन, मनगट आणि मेंदू बळकट तोच खरा छत्रपती. जो स्व संरक्षणात फिरतो तो मराठा असूच शकत नाही. मराठ्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे. भूमीला विसरू नका असे कळकळीचे आवाहन मुळीक यांनी केले. अन्नदात्या शेतकऱ्याला, ज्यांनी धरणासाठी आपल्या कसत्या जमिनी दिल्या त्यांना अजिबात विसरता कामा नये. शासनाने त्यांच्या पाठीशी उभे रहावे असे आवाहन करून जो पर्यंत देशातील शेतकरी सुस्थितीत येत नाही तो पर्यंत देश पुढे जाणे अशक्य असल्याचे बुधाजी मुळीक यांनी आपल्या भाषणात सांगितले. राकेश व अलका बक्षी, नितीन देसाई, बुधाजी व शालिनी मुळीक, प्रकाश व शैला बोराडे, लेखक महेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक अविनाश पाटील, महिला क्रिकेट पटू कमल सावंत आदींचा हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.