मुंबई – मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तामिळनाडूत जसे ६९ टक्के आरक्षण आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात आरक्षण वाढविले पाहिजे. तामिळनाडूत ओबीसी मध्ये दोन प्रकारचे आरक्षण असून एका ओबीसी गटाला ३० टक्के आणि दुसऱ्या ओबीसी गटाला २० टक्के आरक्षण तसेच अनुसूचित जातीला १८ टक्के आणि आदिवासींना १ टक्का आरक्षण असे मिळून ६९ टक्के आरक्षण तामिळनाडूत आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रात आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाढवून मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले पाहिजे अशी भूमिका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकाार परिषदेत मांडली.
तसेच मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनात जीव ओतला असून त्यांचा जीव महत्वाचा आहे त्यामुळे मराठा आरक्षण जरूर मिळेल त्यासाठीच्या प्रक्रियेला त्यांनी सरकार ला वेळ द्यावा. मराठा आंदोलकांनी सबुरी संयम बाळगुन शांततेने आंदोलन करावे असे आवाहनही आठवले यांनी याप्रसंगी केले.
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार पारिषदेत रामदास आठवले बोलत होते. यावेळी रिपाइं चे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे; युवक आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष पप्पू कागदे; सुरेश बारशिंग; दयाल बहादूरे; विवेक पवार; ऍड.आशाताई लांडगे; घनश्याम चिरणकर; संजय डोळसे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. आठवले म्हणाले की, ओबीसी समूहात कुणाचा समावेश करावा याबाबत चा ठराव राज्य सरकार ने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालया कडे पाठवल्यास आमचे मंत्रालय तो प्रस्ताव तज्ञ समितीकडे पाठवतो त्या समिती च्या निर्णया नंतर आमचे मंत्रालय हा प्रस्ताव मंत्रिमंडळ कॅबिनेट समिती कडे पाठवते त्यानंतर लोकसभा राज्य सभेत चर्चा होऊन बहुमताने तो प्रस्ताव मंजूर होऊन संबंधित जातीचा ओबीसी मध्ये समावेश केला जातो.अशी प्रक्रिया रामदास आठवले यांनी सांगितली.
मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी रिपाइं शांततापूर्ण आंदोलन करणार
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात रिपब्लिकन पक्ष शांततापूर्ण आंदोलन करणार असल्याची घोषणा यावेळी रामदास आठवले यांनी केली. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची पूर्वीपासुनची मागणी आहे. मराठा समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल असणा-या ज्यांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखापेक्षा कमी आहे अशा मराठा समाजातील गरीबांना आरक्षण दिले पाहिजे अशी माझी सुरुवातीपासुन मागणी आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा सुरुवातीपासुन पाठिंबा आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला आमचा पाठिंबा आहे. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण लवकर सोडणे आवश्यक आहे. अन्यथा मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका संभवु शकतो. त्यामुळे राज्य शासनाने लवकरात लवकर तातडीने निर्णय घेवून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवावे असे आवाहनही आठवले यांनी केले.
राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भरपुर प्रयत्न करीत आहे. याबाबत निवृत्त न्यायमुर्ती संदीप शिंदे समितीचा अहवाल आणि शिफारशी राज्य सरकारने स्विकारल्या आहेत. न्यायमुर्ती शिंदे समितीच्या शिफारशीनुसार मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दतीचा अवलंब करण्यात येणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत त्वरीत निर्णय घेवून मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला राज्य शासनाने दिलासा द्यावा. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकारकडे मी सुध्दा प्रयत्नशिल आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाने संपूर्ण देशात खळबळ निर्माण झाली आहे. मराठा समाज राज्यात रस्त्यावर उतरला आहे. आक्रमक होवून आंदोलन करीत आहे. यापूर्वी मराठा समाजाने एक मराठा लाख मराठा म्हणत लाखोंचे मोर्चे शांततेने काढुन संयमाने आंदोलन केले. आता मात्र मराठा समाजाचे आंदोलन आक्रमक होत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवुन देण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे जीवाची बाजी लावुन लढत आहेत. त्यांनी मराठा समाजाला संयम आणि शांत राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांचे आवाहन मराठा समाजाने ऐकुन आंदोलन शांततेच्या मार्गाने करावे.
मनोज जरांगे पाटील यांना उपोषण स्थळी जे लोक भेटतात, ते त्यांची अवस्था पाहुन अश्रु ढाळत आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून मराठा समाजाच्या आंदोलकांनी शांतता ठेवावी. मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्य सरकारने मान्य केले आहे. तरी अद्याप याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला नाही. तरी राज्य सरकारने वेळ न दवडता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय तातडीने घ्यावा. असे आवाहन रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत केले.