मुंबई : इंडिया आघाडीत पाच राज्याच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचे खापर एकमेकांवर फोडले जात आहे. इतकेच नव्हे तर दोषारोपाचे परिणाम गॅंगवारात झाल्याची टीका शिवसेना (शिंदे) प्रवक्त्या, सचिव आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.
कायंदे म्हणाल्या की, पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. दिल्लीत होणारी इंडिया आघाडीची बैठक त्यामुळे पुढे ढकलली आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी देखील या बैठकीकडे पाठ फिरवली. इंडिया आघाडीतील घटक पक्षात एकवाक्यता नाही. वैचारिक साम्य नसल्याने डीएनए कुठेही मॅच होत नाही. एक वंशवाद आणि घराणेशाही सोडल्यास यांच्यात कुठलेही साम्य नाही. मी आणि माझे कुटुंब हे यांचे घोषवाक्य आहे. इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आजवर हेच घोषवाक्य राहिले आहे. आता पाच राज्यांच्या निवडणुकीतील पराभवाचे खापर एकमेकांच्या माथी मारण्याचा प्रकार सुरू आहे. मोठ्या प्रमाणात दोषारोप केले जात असून गॅंगवॉरची स्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप कायंदे यांनी केला. तसेच शिवसेनेला (शिंदे) गद्दार, खोके, बाटलेले अशी विशेषणे लावणाऱ्यांचा जनतेने पर्दाफाश केल्याचे कायंदे म्हणाले.
देशाचे भवितव्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात आहे. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड मध्ये त्यामुळेच भाजपचे सरकार आले आहे. जनतेच्या कल्याणासाठी भाजपचा स्पष्ट अजेंडा होता. एक पक्ष म्हणून लोकांसाठी काय करणार हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. समाजातील प्रत्येक घटकासाठी स्त्रियांसाठी, युवा वर्गासाठी, वृद्धांसाठी भाजपने नवनवीन योजना सुरु केल्या. लोककल्याणाचा अजेंडा त्यांनी जनतेसमोर ठेवला, त्यामुळे जनतेने भरघोस मते देऊन त्यांना विजयी केल्याचे कायंदे म्हणाले. महाराष्ट्रात ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या विविध घटकांसाठी विविध योजना आणल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी १ रुपयात पीक विमा, महिलांसाठी एसटी प्रवासात ५० टक्के सवलत, जेष्ठांसाठी मोफत प्रवास, शिक्षण विभागासाठी विविध योजना आणल्या. मात्र, इंडिया आघाडीकडे कोणताही अजेंडा किंवा योजना नाही. त्यामुळे आगामी काळात इंडिया आघाडीचा पराभव निश्चित असल्याचे कायंदे म्हणाल्या.