गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटरवर दिली माहिती

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : मणिपूरमधील सर्वात जुना शस्त्रगट असलेल्या ‘युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट’ (यूएनएलएफ) या सशस्त्र गटाने आज, बुधवारी शस्त्रे खाली ठेवली. यूएनएलएफने हिंसाचार सोडून शांतता करारावर स्वाक्षरी करत मुख्य प्रवाहात येण्याचे मान्य केल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली.

गृहमंत्री शाह यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर (एक्स) काही फोटो, व्हिडिओ शेअर केले आहेत. यात यूएनएलएफच्या सशस्त्र दलातील जवान शस्त्रे टाकताना दिसत आहेत. याबाबत अमित शहा म्हणाले की, “ऐतिहासिक घटना, यूएनएलएफने आज, बुधवारी नवी दिल्ली येथे शांतता करारावर स्वाक्षरी केली. यामुळे ईशान्येत शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारच्या अथक प्रयत्नांमध्ये एक नवीन अध्याय जोडला गेल्याचे शाह यांनी सांगितले. मणिपूर खोऱ्यातील सर्वात जुना सशस्त्र गट, यूएनएलएफने हिंसाचार सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे मान्य केले आहे. मी त्यांचे लोकशाही प्रक्रियेत स्वागत करतो आणि शांतता आणि प्रगतीच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो. आज भारत सरकार आणि मणिपूर सरकारने यूएनएलएफ सोबत केलेल्या शांतता कराराने 6 दशकांच्या सशस्त्र चळवळीचा अंत झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वसमावेशक विकासाच्या आणि ईशान्य भारतातील तरुणांना चांगले भविष्य प्रदान करण्याच्या प्रयत्नात ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचे शाह यांनी नमूद केलेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!