Mangalprabhat Lodha to set up an independent corporation for protection and conservation of forts

मुंबई, ३ मार्च : महाराष्ट्रातील सर्व गड-दुर्गांचे जतन, संवर्धन, रक्षण करण्यासाठी आणि त्यांवरील अतिक्रमणे दूर करण्यासाठी स्वतंत्र ‘गड-दुर्ग महामंडळा’ची स्थापना येत्या तीन महिन्यांत करण्यात येईल. ठराविक कालमर्यादा ठरवून सर्व गड-दुर्गांवरील अतिक्रमणे हटवण्यात येतील, तसेच उर्वरित सर्व मागण्यांच्या संदर्भात अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर सर्व दुर्गप्रेमी संघटनांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्यात येईल, अशी ठोस आश्वासने राज्याचे पर्यटन, महिला आणि बालविकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’च्या सांगतेच्या वेळी दिली, अशी माहिती ‘महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती’चे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी दिली.

‘महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती’च्या वतीने मुंबईत ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मंत्री लोढा यांनी प्रत्यक्ष आझाद मैदानात येऊन समितीच्या शिष्टमंडळाची भेट घेतली.

1500 हून अधिक शिवप्रेमी सहभागी

‘महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती’ आयोजित ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्च्या’त राज्यभरातून गड-दुर्गप्रेमी संघटनांचे 1500 हून अधिक शिवप्रेमी सहभागी झाले होते. मुखात छत्रपती शिवरायांचा जयघोष, डोक्यावर भगवी टोपी, हातात भगवे झेंडे अन् मागण्यांचे फलक; यांसह तुतारी अणि मावळ्यांची वेशभूषा करत दुर्गप्रेमी उत्साहात या महामोर्च्यात सहभागी झाले होते आणि गड-दुर्गांच्या रक्षणासाठी शासनाला आणि जनतेला पोटतिडकीने आर्त साद घातली.

वंशजांचा सहभाग

मुंबईतील मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान काढण्यात आलेल्या मोर्च्यात नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार श्री. कुणाल मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज श्री. संदेश देशपांडे, धर्मवीर संभाजी महाराज यांची दुधाई वीर धाराऊ माता गाडे पाटील आणि सरनोबत अंतोजीराजे गाडे पाटील यांचे वंशज श्री. अमित गाडे, वीर कोयाजी बांदल यांचे वंशज श्री. अक्षय बांदल, मोरोपंत पिंगळे यांचे वंशज श्री. विश्वजित देशपांडे, श्री. कृष्णाजी गायकवाड यांचे वंशज अप्पासाहेब गायकवाड, वीर शिवा काशिद यांचे वंशज श्री. आनंदराव काशिद, श्री पंताजीकाका बोकील यांचे वंशज गौरव बोकील या छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या वंशजांचा सहभाग लक्षवेधी होता.

विविध संघटनांचे पदाधिकारी

यांसह ‘समस्त हिंदु बांधव संघटने’चे श्री. रविंद्र पडवळ, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर, ‘महाराष्ट्र गड-दुर्ग रक्षण समिती’चे समन्वयक तथा ‘हिंदु जनजागृती समिती’चे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, वसई येथील ‘श्री परशुराम तपोवन आश्रमा’चे संचालक भार्गव श्री बी.पी. सचिनवाला, श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य पिठाच्या ‘धर्मसभा-विद्वत्संघा’चे राष्ट्रीय अध्यक्ष वेदमूर्ती धनंजयशास्त्री वैद्य, ‘सनातन संस्थे’च्या धर्मप्रसारक संत सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर या मोर्च्यात उपस्थित होते. यांसह मोर्च्यामध्ये समस्त हिंदू बांधव संघटना, शिवराज्याभिषेक समिती, मराठा वॉरीयर्स, गड-दुर्ग संवर्धक संघटना, दुर्गवीर प्रतिष्ठान, श्री शंभूदुर्ग प्रतिष्ठान, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, श्री शिवकार्य प्रतिष्ठान, श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडई, रायगड संवर्धन प्रतिष्ठान, हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी (महिला शाखा), युवा मराठा महासंघ, शिववंदनेश्वर प्रतिष्ठान, स्वतंत्र सवर्ण सेना, हिंदु धर्मजागरण, सनातन संस्था, अखिल भारतीय मराठा सेवा महासंघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विश्व हिंदु परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदी 100 हून अधिक गड-दुर्गप्रेमी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!