*खबरदारी म्हणून माळशेज घाटातील वाहतूक थांबविली*
*सततचा पाऊस, धुके यातूनही दरड हटविण्याचे प्रयत्न सुरु*

ठाणे : आज पहाटे माळशेज घाटात दरड कोसळली असून ती हटविण्याचे प्रयत्न सुरु आहेत मात्र सातत्याने पडणारा पाउस, धुके यामुळे या कामांत अडथळे येत आहेत असे राष्ट्रीय महामार्गचे दिनेश महाजन यांनी सांगितले. गेल्या महिन्यात दरड पडली होती तिथून 500 मीटर अंतरावर आज ही दरड कोसळण्याची घटना घडली. पडलेल्या दरडीत मोठे दगड असून ते महामार्गावर सुमारे १०० मीटर अंतर विखुरले आहेत. अजूनही छोटे छोटे दगड या ठिकाणच्या डोंगरमाथ्यावरून पडतच आहेत पण राष्ट्रीय महामार्ग, महसूल विभाग, पोलीस सातत्याने हा मार्ग लवकरात लवकर मोकळा करण्याचे प्रयत्न करीत आहेत असे निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे देखील सातत्याने या ठिकाणाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सुचना देत आहेत.

आज दुपारी २.३०  वाजता प्रांत अधिकारी प्रसाद उकर्डे, महसूल कर्मचारी आणि पोलीस विभागाचे अधिकारी यांच्यासमवेत दरड कोसळलेल्या ठिकाणी पाहणी करण्यात आली व दरड हटविण्याचे काम सुरु करण्यात आले पण पाउस आणि धुके यामुळे ते परत थांबविण्यात आले. सायंकाळनंतर काम सुरु ठेवता येणे शक्य नाही त्यामुळे उद्या सकाळपासूनच परिस्थितीचा अंदाज घेऊन हे काम सुरु होईल. सायंकाळी ४ वाजता आणखी एकदा या ठिकाणाची संयुक्त पाहणीही करण्यात आली.

आजच्या या दुर्घटनेत नगर जिल्ह्यातील पाथर्डीचा टेम्पो चालक अमोल दहिफळे जखमी झाला असून त्याला उपचारासाठी माऊली हॉस्पिटल, आळेफाटा येथे दाखल करण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!