नवी दिल्ली : पैशांच्या बदल्यात प्रश्न विचारल्याच्या प्रकरणात खासदारकी गमावलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) महुआ यांना १९ फेब्रुवारीला हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. परकीय चलन उल्लंघन प्रकरणी ईडीने महुआ यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
गेल्या वर्षी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महुआ मोइत्रा यांच्यावर महागड्या भेटवस्तू आणि पैशांच्या बदल्यात उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्या सांगण्यावरून अदानी समूह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टारगेट करण्यासाठी महुआ मोइत्रा लोकसभेत प्रश्न विचारल्याचा आरोप केला होता. महुआ मोइत्रा यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षेशी छेडछाड केल्याचा ही आरोप करण्यात आला होता. यानंतर हे प्रकरण एथिक्स कमिटीकडे पाठवण्यात आले, जिथे महुआ मोइत्रा या दोषी आढळल्या. यानंतर त्यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली होती.
महुआ यांना समन्स बजावल्याबाबत एका ईडीच्या अधिका-याने माहिती दिली की, सक्तवसुली संचालनालयाने फेमा उल्लंघन केल्या प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा यांना १९ फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. संसदेच्या एथिक्स कमिटीने दोषी ठरवलेल्या महुआ यांनी कोणताही गैरप्रकार केल्याचे आरोप फेटाळले असून अदानी समूहाच्या व्यवहारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचा दावा केला आहे.