लोकसभेच्या आचार समितीने बजावले नवे समन्स

नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर: पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांना लोकसभेच्या आचार समितीने 2 नोव्हेंबरला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. यापूर्वी मोईत्रा यांना 31 ऑक्टोबर रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. परंतु, मोईत्रा यांनी व्यस्ततेची सबब देत आचार समितीकडे वेळ मागून घेतला होता.

महुआ मोईत्रा यांनी आरोपांच्या संदर्भात लोकसभेच्या आचार समितीच्या पहिल्या समन्सला उत्तर देताना सांगितले होते की, 5 नोव्हेंबरनंतर आचार समितीच्या पसंतीच्या कोणत्याही तारखेला व वेळेत समितीसमोर प्रत्यक्ष हजर राहू शकते. दुर्गा पूजा उत्सवाचा संदर्भ देत महुआ मोईत्रा यांनी म्हटले होते की, पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजा हा सर्वात मोठा सण आहे. माझ्या क्षेत्रातील अनेक पूर्व-नियोजित विजयादशमी बैठकांना (सरकारी आणि राजकीय दोन्ही) उपस्थित राहण्यासाठी मी आधीच वचनबद्ध आहे. दरम्यान, याआधी लोकसभेच्या आचार समितीने गृहमंत्रालयाकडे महुआ मोईत्रा यांच्या गेल्या 5 वर्षांतील परदेश दौऱ्यांचा तपशील मागवला होता. महुआ मोईत्रा देशाबाहेर कुठे गेल्या? आणि त्यांनी याबाबत लोकसभेत माहिती दिली की नाही ? याची चौकशी आचार समिती करणार आहे. यानंतर, त्यांचे लॉगिन त्यांच्या एमपी आयडीला जोडले जाईल. तसेच, महुआ मोईत्रा यांच्याशी संबंधित वादात आयटी मंत्रालयाकडून आधीच माहिती मागवण्यात आली आहे.

भाजप नेते निशिकांत दुबे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून महुआ मोईत्रा यांच्याविरोधात तक्रार केली होते. यात मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप निशिकांत दुबे यांनी केला. यानंतर दर्शन हिरानंदानी यांनी मोठा खुलासा केला. उद्योगपती गौतम अदानींबद्दल मोदी सरकारला प्रश्न विचारण्यासाठी महुआ मोईत्रा यांचा वापर केल्याचे स्वतः दर्शन हिरानंदानी यांनी कबूल केले. केंद्र सरकारला प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी महुआ मोईत्रा यांच्या संसदीय लॉगिनचा वापर केल्याचेही दर्शन हिरानंदानी यांनी सांगितले. यामुळे राजकीय वातावरण तापले असून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लोकसभेची आचार समिती स्थापन केली आहे. दुसरीकडे, महुआ मोईत्रा यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!