महावितरणची सौर ऊर्जा निमिर्तीत घोडदौड
बुटीबोरी प्रकल्पाची चाचणी यशस्वी

नागपूर :- मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांचा महत्वाकांक्षी असलेल्या आणि शेतक-यांसाठी नवसंजीवनी ठरणा-या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथील 665 कि.वॅ. क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची चाचणी शुक्रवार (दि. 21 सप्टेबर) रोजी यशस्वीरित्या पुर्ण करण्यात आली. महावितरणने नागपूर जिल्ह्यातील खापा येथील 900 कि.वॅ. क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पापाठोपाठ बुटीबोरी येथील या प्रकल्पाची चाचणीही यशस्वीरित्या पुर्ण केली आहे.

महावितरणच्या बुटीबोरी येथील 33 केव्ही उपकेंद्रातील सुमारे अडीच एकर मोकळ्या जागेत या सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात आली असून या प्रकल्पाच्या चाचणीच्या वेळी येथून तब्बल 301 के.वॅ. ऊर्जा निर्मिती करण्यात आली. या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लवकरच करण्यात येणार असून या प्रकल्पांतून परिसरातील शेतक-यांना सौर वीज वाहिनीतून वीजपुरवठा करण्यात येईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांचेशी चर्चा करून आणि राज्याचे ऊर्जांमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी राज्यभरातील विविध ठिकाणी असलेल्या महावितरणच्या वीज उपकेंद्रातील उपलब्ध मोकळ्या जागेवर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीबाबत योजना तयार केली असून या अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील उपकेंद्रात 900 कि.वॅ. तर बुटीबोरी येथील उपकेंद्रातील 665 कि.वॅ. क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प यशस्वीरित्या सुरु करण्यात आले आहेत. ख़ापा येथील सौर ऊर्जा प्रकल्पातूनही तब्बल 500 कि.वॅ. पर्यंत उर्जा निर्मितीची चाचणी यशस्वीरित्या पुर्ण झाली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील सुमारे 150 ठिकाणी विविध क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पातून 200 मे. वॅ. वीज निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी महावितरणने प्रकल्प ऊभारणी आणि वीज खरेदीसाठीचे करारही केले असून. या प्रकल्पासाठी आवश्यक जागा महावितरणची आहे तर प्रकल्प उभारणीचे काम ईईएसएल या कंपनीतर्फ़े करण्यात येत आहे. बुटीबोरी येथील प्रकल्पातून सुमारे 300 शेतकर्‍यांना वीज पुरवठा होणार असून शेतकर्‍यांना दिवसा 10 ते 12 तास दर्जेदार आणि स्वस्त वीज मिळावी याकरिता राज्य शासनातर्फ़े ही योजना राबविल्या जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *