डोंबिवली : डोंबिवलीत महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली परिवर्तन घडवण्यासाठी “परिवर्तन यात्रा” सुरू करण्यात आली आहे. ही यात्रा केवळ रॅली नसून, जनतेपर्यंत पोहोचण्याचा आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा व्यापक उपक्रम आहे. गेल्या १५ वर्षांपासून डोंबिवलीच्या समस्यांना तोंड देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून या यात्रेची सुरुवात करण्यात आली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी, महाविकास आघाडीतील अन्य पक्षांचे सदस्य, आणि शेकडो कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले आहेत. परिवर्तन यात्रेचा उद्देश लोकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचा आहे. या यात्रेत कोणत्याही प्रकारच्या घोषणाबाजी किंवा राजकीय भाषणबाजीचा समावेश नाही; यात्रेतील सहभागी कार्यकर्ते फक्त चालत, लोकांपर्यंत पोचण्याचे काम करणार आहेत.
शहर प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की, “डोंबिवलीतील समस्यांचा जो डोंगर उभा राहिला आहे, त्या समस्यांच्या डोंगरावर परिवर्तनाचा भगवा झेंडा फडकवू. आम्ही तुळशीचे बीज देऊन परिवर्तनाचे प्रतीक म्हणून नागरिकांना प्रेरणा देणार आहोत. या बीजाचे पाणी घालून लावल्यास परिवर्तनाचे रोप लवकरच बहरेल.”
परिवर्तन यात्रा आज गावदेवी मंदिराच्या दर्शनाने सुरू झाली. ही पदयात्रा २१ ऑक्टोबरपर्यंत, चार ते सात वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. पहिल्या दिवशी, संततधारेच्या पावसातही ही यात्रा ठरलेल्या वेळेनुसार पूर्ण करण्यात आली.
यात्रेत शिवसेनेचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे, सुरज पवार, युवा सेनेचे प्रतीक पाटील, रोहित म्हात्रे, सुजल म्हात्रे, श्याम चौगुले, काँग्रेसचे एकनाथ म्हात्रे, राष्ट्रवादी पक्षाचे राजेश शिंदे, भालचंद्र पाटील (भाऊ) यांच्यासह शेकडो महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
महाविकास आघाडीच्या या परिवर्तन यात्रेने डोंबिवलीतील जनतेच्या मनात परिवर्तनाची नवी उमेद जागवली आहे.