ठाणे : भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त, दिल्ली येथे झालेल्या आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक मिळाले, या विजयी संघामध्ये ठाण्यातील मुद्रा आर्ट अकादमीचे हरिश्चंद्र कोटीयन, अशोक जिंका या दोन युवकांचाही सहभाग होता. या स्पर्धेत, महाराष्ट्राने गोंधळ या लोककला प्रकाराचे अप्रतिम सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटकावला.
दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राज्यांना आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेसाठी निमंत्रित केले जाते. यावर्षीच्या स्पर्धेमध्ये एकूण १५ सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले होते. विविध राज्ये व केंद्र शासनाच्या विभागानी लोककला व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे या स्पर्धेमध्ये सादरीकरण केले होते.
सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने, यावर्षी या आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेत; महाराष्ट्रातील भैरी भवानी परफॉरमिंग आर्ट्स या लोककला समूहाने गोंधळ या लोककला प्रकाराचे अप्रतिम सादरीकरण केले. या सादरीकरणात एकूण १४ कलाकारांनी भाग घेतला. त्यामध्ये ठाण्यातील मुद्रा आर्ट अकादमीचे हरिश्चंद्र कोटीयन, अशोक जिंका यांनी सहभाग घेत उत्तम सादरीकरण केले. मागील अनेक वर्षांपासून हे दोघेही या अकदामीमध्ये लोककला नृत्याचे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. राज्याला अभिमान वाटावा आणि राज्याच्या सांस्कृतिक शिरपेचात मानाचा तुरा रोवलेल्या स्पर्धेत ठाण्यातील मुद्रा आर्टचे नृत्यकलाकार सहभागी होणे ही ठाणेकरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे मुद्राच्या संचालिका तेजश्री सावंत यांनी सांगितले.