मुंबई, दि. 1 : सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक विकास घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन बलशाली महाराष्ट्र घडवूया, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय समारंभात केले.
छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित समारंभात राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, स्थानिक लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव मनोज सौनिक, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक इकबालसिंह चहल, शासनाच्या विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, देवेन भारती, अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) निसार तांबोळी, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, विविध विभागांचे प्रधान सचिव, माहिती महासंचालक जयश्री भोज यांच्यासह वरिष्ठ शासकीय आणि पोलीस अधिकारी, तिन्ही सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी, विविध देशांचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनी राष्ट्रगीत आणि राज्यगीत गाऊन ध्वजाला मानवंदना दिली. सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) मार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
राज्यपाल बैस यांनी यावेळी आपल्या भाषणात जगभरातील मराठी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. त्याचप्रमाणे कामगारांच्या आणि श्रमिकांच्या घामातून हा महाराष्ट्र घडल्याचा उल्लेख करून आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाबरोबरच महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षि छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अशा अनेक विभूतींनी महाराष्ट्राला सामाजिकदृष्ट्या समृद्ध केल्याचा त्यांनी उल्लेख केला.
राज्यपाल म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशकानुसार शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष आहे. यानिमित्ताने 2 ते 9 जून 2023 या कालावधीमध्ये शिवराज्याभिषेक महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित संग्रहालय उभारण्यात येणार आहे. याशिवाय पुण्यातील आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उभारण्यात येणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा 28 मे हा जन्मदिवस शासनामार्फत ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. शासनाने 19 फेब्रुवारी 2023 पासून राज्यगीत म्हणून ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत स्वीकारले असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य शासन करीत असलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून राज्यपाल म्हणाले, कोविडनंतर अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करून रोजगार निर्मितीवर भर देण्यात येत आहे. राज्यात लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहे. स्टार्टअप आणि इको सिस्टीम वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. कोविडच्या तीन लाटांचा नियोजनबद्ध रितीने सामना करीत महाराष्ट्राने देशात एक उदाहरण निर्माण केल्याचे सांगून राज्यातील जनतेने आपले आरोग्य सांभाळावे असे आवाहन त्यांनी केले. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना शासनामार्फत विविध विभागांमध्ये 75 हजार शासकीय नोकर भरतीची प्रक्रिया वेगाने सुरू असून याअंतर्गत राज्यातील पोलीस यंत्रणा सक्षम करण्यासाठी 18 हजार 331 शिपाई भरती प्रक्रियाही प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या संचलनात राज्य राखीव पोलीस बल, बृहन्मुंबई सशस्त्र पोलीस बल, बृहन्मुंबई दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई महिला पोलीस दल, मुंबई लोहमार्ग पोलीस दल, निशाण टोळी (महाराष्ट्र पोलीस ध्वज, बृहन्मुंबई पोलीस ध्वज, राज्य राखीव पोलीस बल ध्वज, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय ध्वज, बृहन्मुंबई अग्निशमन दल ध्वज), बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा, ब्रास बँड पथक, पाईप बँड पथक, बृहन्मुंबई पोलीस दलाची वाहने (महिला निर्भया पथक), बृहन्मुंबई अग्निशमन दल वाहने (आर्टिक्युलेटेड वॉटर टॉवर आणि 64 मीटर टर्न टेबल लॅडर) यांनी सहभाग घेतला.
नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्र
राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासन सेवेत नवनियुक्त उमेदवारास नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. यामध्ये तुषार संभाजी गवारी, गौरव उत्तम शिंदे, आशिष विठ्ठल दराडे, हेमिती विजय सावंत, श्रीमती वैशाली विजय यादव आणि श्रीमती आरती सदानंद तांदळे, श्रीमती पूजा दत्तात्रय दाभाडे, राहुल सत्यवान शिंदे, योगेश अशोक चव्हाण, प्रणव मोठाभाऊ भामरे यांचा समावेश होता.
चित्ररथ स्पर्धेचे निकाल जाहीर
प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी 2023 रोजी झालेल्या सोहळ्यात एकूण 16 चित्ररथांचे सादरीकरण झाले होते. यामधून कृषी विभागाच्या चित्ररथाने प्रथम, सांस्कृतिक कार्य विभागाने द्वितीय तर गृह विभागाच्या (वाहतूक) चित्ररथाने तृतीय क्रमांक मिळवल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजन राजशिष्टाचार विभागाचे सहसचिव रामचंद्र धनावडे, उपसचिव दिलीप देशपांडे, अवर सचिव मिलिंद हरदास, कक्ष अधिकारी युवराज सोरेगावकर, श्रीधर देशमुख, भरत जैत आणि त्यांच्या पथकाने केले. सूत्रसंचालन नरेंद्र बेडेकर आणि शिबानी जोशी यांनी केले. किरण शिंदे, अरूण शिंदे, विवेक शिंदे यांच्या पथकाने सनई चौघडा वादनाने तर पांडुरंग गुरव यांच्या पथकाने तुतारी वादनाने कार्यक्रमाची सुरूवात केली.
00000