मुंबई-२१-(प्रतिनिधी)– भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला जास्तीत जास्त शिक्षण घेण्याचा संदेश दिला होता.त्यांच्या या संदेशाची अंमलबजावणी करताना गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ६ डिसेंबर या त्यांच्या महापरीनिर्वाणदिनी दादर चैत्यभूमी सह राज्यात सर्वत्र शैक्षणिक वस्तूंनी अभिवादन करण्यात येणार आहे.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सर्वोच्च शिक्षण घेतले जगातील सर्वात बुध्दिवान व्यक्ती म्हणून कोलंबिया विद्यापीठाबाहेर त्यांचा पुतळा बसविण्यात आलेला आहे. भारताचे संविधान लिहीण्यासह अर्थतज्ञ,कामगार नेता महिलांचे अधिकार अशा विविध शेकडो विषयांवर त्यांनी पुस्तके लिहीली.हे केवळ शिक्षणामुळेच शक्य झाले . शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असा मोलाचा शैक्षणिक संदेश त्यांनी समाजाला दिला होता. त्यामुळे येत्या ६ डिसेंबर या त्यांच्या महापरीनिर्वाणदिनी दादर चैत्यभूमी व नागपूर दीक्षाभूमीसह राज्यात सर्वत्र त्यांना वह्या पेन पेन्सिल स्कूल बॅग, पुस्तके आदी शैक्षणिक साहित्यांनी त्यांचे अभिवादन केले जाणार असल्याची माहिती महामानव प्रतिष्ठान तसेच एक वही एक पेन अभियानचे अध्यक्ष पत्रकार राजू झनके यांनी दिली आहे..
डाॅ.बाबासाहेब आंबेडकरा, छत्रपती शिवाजी महाराज, महात्त्मा ज्योतीबा फुले,सावित्रीमाई फुले , जिजाऊ ,यांच्यासह महापुरुषांचे जयंतीउत्सव,गणेशोत्सव व नवरात्रोत्सव महापरिनिर्वाण दिन दिन , धम्म चक्र प्रवर्तन दिन, संविधान दिवस स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन या सणांसह, वाढदिवसाला अनावश्यक खर्च टाळून समाजातील गरजू आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे व आवश्यक वस्तूंचे वितरण करावे असे आवाहन महामानव प्रतिष्ठान व एक वही एक पेन अभियानाच्या वतीने मागील सात वर्षांपासून करण्यात येते या आवाहनाला समाजातून वाढता प्रतिसाद मिळत आहे . महामानव प्रतिष्ठान व एक वही एक पेन अभियानाच्या वतीने मागील सात वर्षात हजारो गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वितरण करण्यात आले आहे
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आजही गावकुसाबाहेरील दुर्गम भागातील वर्ग शिक्षणाच्या मूळ प्रवाहापासून वंचित आहे.सरकारमार्फत विविध योजना राबविल्या जात असल्या तरी हा वर्ग अज्ञानतेमुळे शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित राहिलेला आहे. सशक्त भारत निर्माणासाठी भारत साक्षर होणे ही काळाची गरज असून या वर्गाला शैक्षणिक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी राज्यातील सर्व सामाजिक,राजकीय धार्मिक संस्था संघटनांनी देखील डाॅ बाबासाहेब आंबेडकरांना शैक्षणिक वस्तूंचे अभिवादन हा उपक्रम ठिक ठिकाणी राबवावा.जमा झालेल्या साहित्याचे समाजातील गरजू विद्यार्थ्यांना वितरण करावे असे आवाहन महामानव प्रतिष्ठान व एक वही एक पेन अभियानच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर उपक्रमात आपला सहभाग देण्यासाठी ९३७२३४३१०८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान एक वही एक पेन अभियानांतर्गत ६ डिसेंबर रोजी दादर चैत्यभूमीवर मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात समाजातील १०० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या किटचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती राजू झनके यांनी दिली आहे.