मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंचा भीमसागर चैत्यभूमीवर दाखल झाला आहे. लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटांतील भीम अनुयायांनी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठा रांगा लावल्या आहेत.

देशाच्या विविध भागांतून आलेल्या महिला, वृद्ध, तरुणांचे जथ्थे यांनी चैत्यभूमीवर मध्यरात्रीपासून हजेरी लावली. रेल्वे स्थानकातून ते चैत्‍यभूमीपर्यंतचे रस्‍ते गर्दीने भरून गेले आहेत. चैत्यभूमीवर आलेल्या भीम अनुयायांची गैरसोय होऊ नये, याकरिता मुंबई महापालिकेतर्फे सर्वांसाठी विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे लोकांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पालिकेकडून सीसीटीव्ही कॅमेरे हे चैत्यभूमी परिसर आणि शिवाजी पार्क तसेच आजूबाजूच्या परिसरात लावण्यात आले असून त्याच्या माध्यमातून सुरक्षिततेची काळजी घेण्यात येत आहे. तसेच चैत्यभूमी ते वरळी, शिवाजी पार्क, दादर रेल्वे स्थानक, डॉ. आंबेडकर भवन आणि डॉ. बाबासाहेबांचे निवासस्थान असलेल्या राजगृह या ठिकाणी समता सैनिक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य आणि पश्चिम रेल्वेने दादर स्थानकात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. दादर स्थानकातून चैत्यभूमी येथे कसे जायचे? याचे सूचना फलक स्थानकात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. तसेच रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांद्वारे मदत कक्षही उभारण्यात आले आहेत. अनुयायांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी दादरमध्ये पर्यायी मार्ग खुले करण्यात आले आहेत. त्याशिवाय वैद्यकीय अधिकारी आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पथक शिवाजी पार्क परिसरात सज्ज ठेवण्यात आले आहे. अनुयायांना येथे आरोग्य तपासणी सुविधा उपलब्ध करण्यात आली असून मोफत औषधे पुरवली जात आहे.

शिवाजी पार्कच्या प्रवेशद्वारापासून रस्त्यांच्या दुतर्फा पुस्तकविक्रीसाठी लहान-मोठे स्टॉल उभारण्यात आले. नाममात्र दरात या पुस्तकांची विक्री होत असल्याने पुस्तक खरेदीला प्रचंड पसंती असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्रे, मूर्ती, गीतांच्या सीडी यांचे स्टॉल उभारण्यात आले . सोबतीला गौतम बुद्ध यांच्या विविध मूर्ती, लॉकेट, की-चेन यांचेही स्टॉल आहेत.

पंतप्रधान, राज्यपाल मुख्यमंत्रयांकडून अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन केलं. ‘भारतीय संविधानाचे शिल्पकार असण्यासोबतच बाबासाहेब सामाजिक एकोपा निर्माण करणारे नेते होते. त्यांनी कायमच समाजातील शोषित आणि वंचित घटकांच्या चांगल्यासाठी जीवन समर्पिक केलं. आज, त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी त्यांना अभिवादन करतो’, असं पंतप्रधानांनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!