मुंबई, दि. ६ : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रुजलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्वे सर्वव्यापी आहेत, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काढले. दादर येथील चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते.
राज्यपाल म्हणाले की, भारताच्या संविधानामुळे सर्वांना प्रत्येक क्षेत्रात संधी मिळतात याचे श्रेय आपल्या राज्यघटनेला जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचितांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे केलेले काम हे अत्यंत मोठे आहे.भारत घडविण्यात डॉ.बाबासाहेबांचे मोठे योगदान आहे. त्यांचे विचार पुढे नेण्याचे काम करूया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेबांचे स्मारक लवकरच पूर्ण होईल –मुख्यमंत्री शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने सर्वसामान्यांना जगण्याचा हक्क दिला. डॉ. बाबासाहेब यांचे विचार व कार्य जागतिक पातळीवर पोहोचावे यासाठी इंदू मिल येथील स्मारकाचे काम लवकरात-लवकर पूर्ण होण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. डॉ. बाबासाहेबांनी सर्वसामांन्याना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली.सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून डॉ. बाबासाहेब यांनी राज्यघटना दिली, वैचारिक बळ देवून गुलामगिरीतून बाहेर पडण्याची प्रेरणा दिली. “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’’ हा मूलमंत्र दिला. त्यांच्या विचारांवर राज्य सरकार वाटचाल करीत आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी आणि ऐतिहासिक ठेवा जोपासला जाईल. सर्वसामान्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार कार्यरत राहील. राज्यात शासकीय वसतिगृहांची संख्या वाढवण्यावर भर देण्यात येत आहे, शिष्यवृत्ती वाढविली जात आहे. सर्वसामान्यांच्या उत्थानासाठी निर्णय घेतले जात आहेत. नुकतेच स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन केले आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
जगात सर्वोत्तम संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले – उपमुख्यमंत्री फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जगाच्या पाठीवरील सर्वोत्तम संविधान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले. सर्वसामान्य व्यक्तीला सर्वोच्च स्थानी जाण्याची संधी आपल्या संविधानामुळे मिळाली आहे. आजचा दिवस भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प घेण्याचा आहे. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून देशाची दिशा बदलण्याचे काम केले. सर्वसामान्य व्यक्तीला समान अधिकार दिले. कोणताही भेद करता येणार नाही असा बीजमंत्र त्यांनी आपल्याला दिला. समता, बंधुत्व, मानवतेचा संदेश दिला. गौतम बुद्धांचे विचार समाजात रुजविण्याचे काम संविधानाच्या माध्यमातून केले. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देखील ‘देशाच्या संविधानामुळे आपल्याला सर्वोच्च स्थानी पोहोचता आले’ याचा आवर्जून उल्लेख करतात. संविधानाची खरी शक्ती ही आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अतिभव्य स्मारकाचे काम लवकरच पूर्ण केले जाईल, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
यावेळी मुंबई महापालिकेच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेषांकाचे वितरण मान्यवरांना करण्यात आले. दिव्यांग विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार असलेल्या माहिती पुस्तिकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.