मुंबई : राज्यातील एका पाठोपाठ उद्योग गुजरातला नेले जात असताना आता महाराष्ट्रातील महानंद देखील गुजरातला नेण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र महानंद गुजरातला नेल्यास शिवसेना (ठाकरे) शांत बसणार नाही, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.महाराष्ट्रात हे धृतराष्ट्राचे सरकार निर्माण झाले असून जे महाराष्ट्राचे अपमान, महाराष्ट्राची लूट उघड्या डोळ्याने बघत आहे, असा आरोपही राऊत यांनी केला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील ‘एक्स’वर पोस्ट करून महानंदबाबतच्या या प्रस्तावाला विरोध केला आहे.
महानंद डेअरी गुजरातला नेण्यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तासंदर्भात खासदार राऊत यांनी राज्य सरकारवर टिकेची झोड उठवली. राऊत म्हणाले,महाराष्ट्रात दुधाचे अनेक ब्रँण्डस् आहेत. महानंद, गोकूळ, वारणा, चितळे असे अनेक ब्रँण्डस् आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात दूध उत्पादन किंवा डेअरी यांचे खूप मोठे जाळे आहे. त्यासाठी अमूलच पाहिजे असे नाही. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चर्चेत राहिलेल्या नंदिनी ब्रँडचा देखील त्यांनी यावेळी उल्लेख केला. कर्नाटकात नंदीनी नावाचा ब्रँड केंद्र सरकारने मारण्याचा प्रयत्न केला आणि त्या एका नंदीनी ब्रँण्डवर कर्नाटकची निवडणूक लढवली गेल्याचा आरोप करत आता महाराष्ट्रातील महानंद देखाल गुजरातला नेण्याचा प्रयत्न होत आहे, असे राऊत म्हणाले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना हे दिसत नाही का, असा सवाल करत अशा प्रकारे राज्यातील एक एक उद्योग, व्यवसाय रोज ओरबडून गुजरातला नेले जात आहेत. हे तोंडाला कुलूप लावून बसलेले आहेत. या राज्यातली दुग्ध व्यवसायातील सहकारी चळवळ गुजरातला नेत आहेत आणि एकजात सगळे दिल्लीच्या ताटाखालचे मांजर बनून हे सगळे सहन करत आहेत.
महानंद डेअरीबाबत बोलताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, “मला असं वाटतं की महानंदा आणि सरकार यांनी ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे होतं, त्या कामामध्ये निश्चितच त्रुटी राहिलेल्या आहेत.