टोळ आरोग्य उपकेंद्राच्या उद्घाटनापूर्वीच नव्या इमारतीला तडे
महाड (निलेश पवार): महाड तालुक्यातील अनेक आरोग्य उपकेंद्राच्या इमारती धुळ खात पडल्या असून तर अनेक उपकेंद्र बंद अवस्थेत आहेत. टोळ गावातील आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीच्या निकृष्द दर्जाचे काम समोर आलय. इमारतीच्या उद्धाटनापूर्वीच नव्या इमारतील तडे गेले आहे. यामुळे लाखो रूपयाचा खर्च केवळ ठेकेदारासाठी केला का असा प्रश्न गावक-यांकडून विचारला जात आहे.
महाडमध्ये जवळपास 23 आरोग्य उपकेंद्र बांधण्यात आली आहेत. त्यापैकी निम्यापेक्षा अधिक उपकेंद्राची दुरावस्था झालीय. खाडीपट्टा विभागातील दासगाव आरोग्य केंद्राच्या अंतर्गत चालणारे टोळ गावातील आरोग्य उपकेंद्र कायम बंद अवस्थेत असते. ग्रामिण आरोग्य अभियानांतर्गत ही इमारत बांधण्यात आली असली तरीसुध्दा जिल्हा परीषदेने यावर संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ता, आणि आतील परिसरावर सुमारे आठ लाख रूपये खर्च केलाय. सन 2012 – 13 मध्ये या इमारतीचे काम झाले असून अजूनही इमारतीचे उद्घाटनही करण्यात आलेले नाही. नव्या इमारतींच्या भिंतींना तडे गेल्या असून समोरच्या बाजूकडील काचाही फुटल्या आहेत तसेच डे्नेजचे पाईपही फुटले आहेत. विशेष म्हणजे इमारतीच्या वरील बाजूस जाण्यास जिन्याकरीता जागा सोडण्यात आली आहे मात्र जीना बांधण्यात आलेला नाही. गावाच्या अंतर्गत रस्त्यापासून केवळ २० फुटाच्या रस्त्याला जिल्हा परीषदेने तब्बल 1 लाख 63 हजार रूपये खर्च केले आहेत. सन 2014 मध्ये रस्त्याचे काम पूर्ण झालेले आहे. अंतर्गत रस्ता असा उल्लेख असला तरी संबधीत ठेकेदाराने पेव्हर ब्लॉक टाकून काम केले आहे. या इमारतीला रायगड जिल्हा परीषदेने संरक्षण भिंतीवर देखील खर्च केलाय. हे काम देखील सन 2014 मध्येच झाले असून हे काम देखील त्याच ठेकेदाराने केले असून याकरीता जवळपास 5 लाख रूपये खर्च केले आहेत. लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या इमारतीची अवघ्या चार वर्षातच दुरावस्था झालीय. शासनाच्या लाखो रूपये वाया घालवणा-या अधिका- यावर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत यांनी केलीय.