महाडमध्ये भात कापणीची लगबग
महाड(निलेश पवार) – महाड तालुक्यात गत महिन्यात अवेळी पावसाने शेतकरी वर्गात भात शेतीबाबत चिंता निर्माण झाली होती मात्र पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांनी भात कापणी सुरु केली आहे. तालुक्यात सर्वत्र भात पिक यावेळी झालेल्या समाधानकारक पावसामुळे चांगले आले आहे. यामुळे शेतकरी वर्ग देखील उत्साहात भात कापणी करताना दिसत आहे.
महाड तालुक्यात सर्वत्र भात पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. जवळपास १२५० हेक्टरवर भात पिक काढले जाते. उर्वरित डोंगर भागात नाचणी आणि इतर कडधान्य अल्प प्रमाणात घेतली जातात. महाड मध्ये घेतले जाणारे भात पिक हे पूर्वीच्या मानाने व्यावसायिक दृष्ट्या कमी प्रमाणात असले तरी शेतकऱ्यांच्या गरजेइतके पिक याठिकाणी घेतले जाते. यावर्षी सुरवातीला पावसाने थोडी उसंत घेतली होती मात्र त्यानंतर जोर पकडल्याने भात लावणी लांबली होती. असे असले तरी भात पिकाला पोषक वातावरण आणि चांगला पाउस यामुळे भात पिक देखिल समाधानकारक आले आहे. सुवर्णा, जया, गुजरात कोलम या जातीचे भात जोमाने आले असले तरी डोंगर उतारावर असलेल्या जमिनीत मात्र पाणी टिकून राहत नसल्याने कांही भाताच्या बियाणांची योग्य वाढ झाली नसल्याचे वाळण गावातील जामदार या शेतकऱ्याने सांगितले.
उशिरा आलेल्या पाऊसाचा परतीचा प्रवास लांबल्याने आलेले चांगले भात पिक तोंडातून निघते कि काय अशी भीती शेतकऱ्यापुढे होती. कांही ठिकाणी अवेळी पावसाने भात पिकाचे नुकसान झाले असले तरी तालुक्यात अन्य ठिकाणी मात्र भात पिक चांगले आले आहे. दीपावली सुरु होताच कांही शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरवात केली होती. दीपावली संपताच याला आता अधिक जोमाने सुरवात झाली आहे. महाड तालुक्यातील रायगड विभाग, विन्हेरे, वाळण, बिरवाडी याठिकाणी शेतकरी भात कापणी करून तेथेच उडवी रचून ठेवत आहेत. या भात कापणीला मुंबई, सुरत, येथील एक तरी चाकरमनी गावी आला आहे. समाधानकारक पडलेला पाउस यामुळे आलेले उत्तम भात पिक यामुळे सर्वत्र शेतकरी उत्साहात भात कापणीला लागला आहे.
महाड मध्ये सुरवातीला पाऊस कमी पडल्याने पेरणी उशिरा झाली मात्र पाऊस चांगला पडल्याने भात पिक उत्तम आले आहे. भात पेरणी आधी पासून ते भात कापणी आणि त्यानंतर भात झोडणी, मळणी या प्रक्रियेपर्यंत मोठ्या प्रमाणात मानवी शक्ती आणि आर्थिक शक्ती लागते. यामुळे येथील पारंपारिक शेतीमुळे केवळ घरी पुरेल एव्हढेच धान्य पदरात पडते – (अनंत पवार शेतकरी कोंझर )