चवदारतळे सत्याग्रहाच्या  स्मृतीदिनी भिमसागर लोटला 

 महाड ( निलेश पवार ) : महाडमध्ये चवदारतळे सत्याग्रहाच्या ९१ व्या स्मृतीदिनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी महाडमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून भिमसागर लोटला होता. यामुळे चवदारतळे, क्रांती स्तंभ  आणि संपूर्ण महाड परिसर निळ्या ध्वजांनी, जय भिमच्या घोषणांनी दणाणून गेला. या सोहळ्याला प्रथमच महाडमध्ये मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त आणि प्रशासकीय नियोजन करण्यात आले होते. चवदारतळ्याचा ज्या पायऱ्यांवरून बाबासाहेब खाली उतरले आणि पाण्याला स्पर्श केला त्या पायऱ्यांवर भीम अनुयायी पाणी प्राशन करण्यासाठी आणि चवदारतळ्याचे पाणी कलशातून घेवून जाण्यासाठी एकच गर्दी केली होती.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडमध्ये जागतिक पातळीवरील सामाजिक क्रांती केली. या क्रांतीचा ९१ वा स्मृतिदिन आज महाडमध्ये साजरा झाला. यावेळी विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटनांच्या वतीने अभिवादन सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्मृतीदिनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भिमसागर लोटला होता. यामुळे चवदारतळे परिसर भीमजयघोषाने दणाणून गेला. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रा.जोगेंद्र कवाडे, रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले, बौद्धजन पंचायत समितीच्या मीराताई आंबेडकर, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे मनोज संसारे, भारत मुक्ती मोर्चाचे वामन मेश्राम आदी दिग्गज नेत्यांनी महाडमध्ये अभिवादन केले. त्याचबरोबर शासनाचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, या मंत्रीमहोदयांनी देखील महाडमध्ये बाबासाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

बाबासाहेबांचे विचार देशाला पुढं नेतील : बडोले

समाजकल्याण विभागाचे मंत्री राजकुमार बडोले म्हणाले की,  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व, या विचारांची चेतना दिली. हि चेतना पक्ष, जाती धर्मा पलीकडील आहे असे मत व्यक्त करून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारच देशाला पुढे घेवून जातील असे सांगितले. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील चवदारतळे हे तमाम भीम अनुयायांकारिता श्रद्धेचे स्थान असल्याने या तळ्याचे पाणी पिण्यायोग्य करण्याकरिता योजना आखणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. तसेच क्रांतीस्थंभ येथे बौद्धजन पंचायत समितीच्या सभेत बोलताना आनंदराज आंबेडकर यांनी सध्याच्या सामाजिक वातावरणावर भाष्य करून समाजाने एक होणे हि काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

 

फलक उदंड झाली, चवदारतळेही झाकले 

महाडमध्ये विविध संघटनाकडून मोठ्या प्रमाणात फलक लावण्यात येतात.  दोन दिवस आधीपासूनच टेम्पो भरून हे फलक महाडपर्यंत आणले जातात. या फलकांमुळे विद्रुपीकरण झाले होते. यामुळे चवदार तळेही झाकून गेले होते.

एक मंच, एक विचार फोल ठरला 

महाडमध्ये एक विचार एक मंच अशी घोषणा देत तरुणांनी एका मंचावर सर्व नेत्यांना आणण्याचा प्रयत्न केला मात्र हा प्रयत्न नेत्यांच्या अनुत्सुकतेमुळे अपयशी ठरला. आंबेडकरी चळवळीतील दिग्गज नेते एक होतील अशी आशा निर्माण झाली असतानाच आज झालेल्या चवदारतळे सत्याग्रह स्मृतीदिनी क्रांतीभूमीत मात्र जैसे थे स्थिती पहावयास मिळाली. याठिकाणी सालाबादप्रमाणे भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बौद्धजन पंचायत समिती, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक या पक्षांचे वेगवेगळे मंडप उभे राहिले होते. महाडमधील एक मंच एक विचार या विचाराने प्रेरित तरुणांनी मात्र आपले स्वयंसेवक तयार करून प्रशासनाला उत्तम मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *