मुंबई : मी पक्षप्रमुख नाही तर २०१९ साली अमित शाह युतीची चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर माझ्याकडे कशासाठी आले ? देवेंद्र फडणवीसांनी पाच वर्ष मुख्यमंत्रीपद कुणाच्या पाठिंब्यावर उबवली ? असा सवाल करीत उद्धव ठाकरे यांनी आमदार अपात्र प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयावर लवादाने नाही, लबाडाने निर्णय दिल्याची टीका केली.
शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेंच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर ठाकरे गटाने थेट जनतेच्या कोर्टात उतरण्याची तयारी केली आहे. मुंबईतील वरळीत एनएससीआय डोम येथे ठाकरे गटाची महापत्रकार परिषद घेतली. जनता न्यायालयात सत्य ऐका आाणि विचार करा या महापत्रकार परिषदेत नार्वेकरांच्या निकालाची पोलखोल करीत उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला.
ठाकरेंचे ‘शिंदे नार्वेकरांना थेट आव्हान ..
उध्दव ठाकरे म्हणाले की, “लबाडाने नाही लवादाने जो निर्णय दिलाय त्याच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालायत गेलोय. सरकार कोणाचे ही असो पण सत्ता ही जनतेची असायला पाहिजे. माझं तर आव्हान आहे नार्वेकर आणि मिंद्यांनी यावं. एकही पोलीस न घेता यावं आणि तिथे शिवसेना कुणाची हे सांगावं मग जनता ठरवेल कुणाला पुरावा, कुणाला गाडावा आणि कुणाला तुडवावा,” असे थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.
“मला तरं वाटत आपण निवडणूक आयोगावर खटला केला पाहिजे. निवडणुक आयोगात आपण १९ लाख ४१ हजार प्रतिज्ञापत्रे सादर केली होती. मगं निवडणूक आयोग त्याच्या गाद्या करुन झोपले होते का? अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. तसेच एकतर ती प्रतिज्ञापत्रे स्विकारा किंवा आमचे पैसेतरी परत करा,” अशी कोपरखळीही ठाकरेंनी यावेळी मारली. रामशास्त्री आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे महापुरूष झाले त्याच मातीतून त्यांनी लोकशाही संपवायला सुरूवात केली आहे ही महाराष्ट्राची माती आहे संपवणा-यांनाच ही माती गाडून टाकते हा इतिहास आहे असेही ठाकरे म्हणाले.