मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट सामील झाला आहे त्यामध्ये आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये सहभागी होण्याचे निश्चित मानले जात आहे. महायुतीचे जागावाटप निश्चित झाले आहे. शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रावादीला हव्या असलेल्या जागा देण्याचे धोरण ठरले आहे. त्यासोबतच महायुतीमध्ये मनसेला सहभागी करुन घेत भाजप त्यांना दोन ते चार जागा देणार असल्याचं ठरलं असल्याची खात्रीलायक माहिती आहे. दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे

महायुतीचे जागावाटप निश्चित झाले असून भाजप 30, शिंदे गट 12, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 4 आणि मनसेला 2 जागा मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गट आणि अजित पवार गटाला निवडून येऊ शकतील अशाच जागा देण्याचे ठरले आहे. मनसेला महायुतीत सहभागी करुन घेतल्यानंतर त्यांना मुंबईतील एक आणि मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमधील एक लोकसभा मतदारसंघ मिळण्याची दाट शक्यता आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून राज ठाकरेंसोबत असलेले पक्षाचे नेते, माजी आमदार बाळा नांदगावकर यांना दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील माझगाव विधानसभा मतदारसंघातून ते आमदार राहिले आहेत. तर मनसेच्या वाट्याला दुसरा मतदारसंघ हा नाशिक असणार आहे. नाशिककरांनी महापालिकेच्या माध्यमातून सर्वात प्रथम मनसेला सत्ता दिली होती. येथे पक्षाचे तीन आमदार निवडून आले होते. त्यामुळे नाशिक मतदारसंघ मनसेला दिला जाण्याची शक्यता आहे.

दक्षिण मुंबई मतदारसंघ सध्या शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यात आहे. येथे अरविंद सावंत दोन वेळा खासदार राहिले आहेत. महायुतीत या जागेची मागणी शिवसेना शिंदे गटाने केली होती. भाजपकडून येथे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर इच्छूक आहेत. पक्षांतर्गतच त्यांना मंगलप्रभात लोढा यांचा सामना करावा लागत आहे. मात्र भाजपने ही जागा मनसेला देण्याचे निश्चित केले असल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!