ठाणे १५ ऑगस्ट : शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना निवासासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध व्हावे यासाठी ठाण्यात उभारण्यात आलेले डॉ. पंजाबराव देशमुख मराठा विद्यार्थी वसतीगृह हे महाराष्ट्रातील पहिले वसतीगृह असल्याचे उद्गगार आज राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लोकार्पण सोहळ्याप्रसंगी काढले.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख मराठा विद्यार्थी वसतीगृहाचा लोकार्पण सोहळा आज राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते व महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी खासदार कुमार केतकर, सर्वश्री आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, उपमहापौर सौ. पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय देवराम भोईर, सभागृह नेते अशोक वैती, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (2) संजय हेरवाडे, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती प्रियंका पाटील, वर्तकनगर प्रभाग समितीच्या अध्यक्षा राधिका फाटक, स्थानिक नगरसेविका विमल भोईर, कल्पना पाटील, विक्रांत चव्हाण, माजी महापौर हरिश्चंद्र पाटील उपायुक्त जनसंपर्क मारुती खोडके, उपायुक्त अशोक बुरपल्ले, मीनल पालांडे, यांच्यासह इतर अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. तसेच यावेळी मराठा क्रांती मोर्चा ठाणे, सकल मराठा समाज ठाणे तसेच मराठा समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

पोखरण रोड नं 2 येथे ठाणे महापालिकेने उभारलेल्या या वसतीगृहाच्या चाव्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांच्याहस्ते सुपुर्द केल्या. यापुढे वसतीगृहात मराठा मुलामुलींना प्रवेश देण्याबाबतची संपूर्ण जबाबदारी ही शासनाची असणार असल्याचे सांगत पालकमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, या वसतीगृहात 50 विद्यार्थ्यांची सोय असून यामध्ये स्वयंपाकघर व भोजनकक्षाची सुविधा अंतर्भूत आहे. प्रत्येक खोलीमध्ये बैठक खोली, स्नानगृह, शौचालय असून त्यामध्ये पलंग, कपाट, अभ्यासासाठी टेबल व खुर्ची, गरमपाण्याची सोय आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच इमारतीच्या पुढील बाजूस 1500 चौ.फूट जागा विद्यार्थ्यांकरिता खेळण्यासाठी व पार्किंगसाठी ठेवण्यात आली आहे. हे वसतीगृह हे पूर्णपणे सुरक्षित असून निश्चितच विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक असे वातावरण आहे असे राज्याचे नगरविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

यावेळी महापौर नरेश म्हस्के यांनीही आपण विद्यार्थ्यांच्या पाठीशी पूर्णपणे सोबत असल्याचे सांगत भाईंदरपाडा येथेही वसतीगृहाचे काम सुरू असून त्या ठिकाणी 100 विद्यार्थ्यांची राहण्याची सोय होणार असल्याचे नमूद केले. ठाणे महापालिकेने उभारलेल्या या वसतीगृहात सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. महापालिकेने उभारलेले वसतीगृह शासनाकडे हस्तांतरीत करताना आनंद होत असून हे वसतीगृह लवकरात लवकर सुरू करण्याबाबतची कार्यवाही शासनस्तरावर होईल असा विश्वास आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक कैलास म्हापदी यांनी मराठा समाजाची भूमिका मांडली तर समन्वयक दिलीप शिंदे यांनी आभार व्यक्त केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेंद्र पाटणकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!