नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजण्याची शक्यता असतानाच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी अचानक राजीनामा दिला. अगोदरच एक पद रिक्त, त्यात गोयल यांनी राजीनामा दिल्याने तीनपैकी दोन रिक्त जागा भरणे आवश्यक होते. त्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आज ज्ञानेश कुमार आणि बलविंदर संधू या दोन अधिका-यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केली. लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी ही माहिती दिली. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना नवनियुक्त आयुक्त मदत करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांच्या समितीने या दोन्ही नावांना संमती दिली. अरूण गोयल यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदांची संख्या दोन झाली होती. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने पावले उचलून या निवडी केल्या. यासंबंधीची माहिती देताना अधीर रंजन चौधरी म्हणाले की, या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, अर्जुन राम मेघवाल आणि माझ्या समितीने या नियुक्त्या केल्या.