वादग्रस्त पद्मावती चित्रपटावर बंदी घाला : भाजप आमदार मंगल प्रभात लोढा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनाला राजपूत आणि हिंदु संघटनांनी विरोध दर्शविला असतानाच आता पद्मावती सिनेमावर महाराष्ट्रात बंदी घालावी अशी मागणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीय.
गेल्या अनेक दिवसांपासून पद्मावती सिनेमा वादाच्या भोव-यात सापडला आहे. पद्मावती सिनेमात राणी पद्मावतीची चित्रीकरण बदनामीकारक आहे. इतिहासात जाणून न घेता हिंदी चित्रपट सृष्टीने महापुरुषांच्या इतिहासाचे विकृतीकरण चालवले आहे. चित्रपटाचे निर्माता संजय लिला भंसाळी यांनी तयार केलेल्या राणी पद्मावती चित्रपटात चुकीचा इतिहास साकारण्यात आला आहे. भारतीय संस्कृतीतील महत्वाच्या व्यक्तीविषयी चुकीच्या पद्धतीने प्रदर्शन करण्याचा अधिकार कोणालाही नाही. पद्मावती सिनेमामुळे धर्मप्रेमी आणि हिंदू प्रेमी मध्ये रोष व्यक्त केला जात आहे. या चित्रपटामुळे समाजात वातावरण प्रदूषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पद्मावती सिनेमावर त्वरित बंदी आणावी, जेणेकरून मनोरंजनाच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडण्याच्या प्रवृत्तीलाही आळा बसणार आहे असे आमदार लोढा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.