लोढा बिल्डर विरोधात शेतकरी एकवटले ..
डोंबिवली (प्रतिनिधी) : लोढा बिल्डरकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी स्थानिक शेतकरी एकवटले आहेत. अन्यायग्रस्त शेतक-यांना न्याय मिळण्यासाठी शेतकरी बचाव समितीच्या शिष्टमंडळाने प्रदेश काँग्रेसचे सचिव संतोष केणे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. शेतक-यांना न्याय मिळण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून शासन व प्रशासन दरबारी आवाज उठविण्यात येईल असे आश्वासन केणे यांनी शिष्टमंडळाला दिले.
लोढा ग्रुपकडून शेतक-यांच्या खोटया सहया व कागदपत्रके तयार करून जमिनींच्या व ताब्यांच्या खरेदी व्यवहारांचा मोबदला तसेच कागदपत्रे न देता हजारो एकर जमीन बळकावण्यात आल्याचा आरोप शेतकरी बचाव समितीने केला आहे. गोरगरीब शेतक-यांना पैसा आणि ताकदीच्या जोरावर दाबले जात आहे. पोलीस व सरकारी यंत्रणेकडे दाद मागूनही कोणताच न्याय मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे असेही शेतक-यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडावी अशी मागणी समितीने केणे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. यावेळी शिष्टमंडळात शेतकरी बचाव समितीचे अध्यक्ष बबन तेटमे यांच्यासह मोहन ठाकरे, तुळशीराम संते, गोपीनाथ पाटील, देवीदास पाटील, भावेश ठाकरे, संतोष फराड आदी शेतकरी उपस्थित होते.
————