ठाणे, (प्रतिनिधी) : ठाणे रेल्वे स्थानकात महापालिकेने प्लॅटफॉर्म क्र. दोनवर उभारलेली लिफ्ट बंद पडल्यामुळे, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिलांसह हजारो प्रवाशांची गैरसोय होत आहे. या प्रकाराकडे भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी लक्ष वेधले असून, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे लिफ्टची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज सुमारे ६ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे महापालिकेने सॅटीस पूल व ठाणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. २ लगत लिफ्ट उभारल्या आहेत. सॅटीस पुलावर बसने जाण्यासाठी आणि प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरुन अन्य प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी नागरिकांना दोन्ही लिफ्ट सोयीच्या आहेत. सध्या सॅटीस पुलाला जोडणारी लिफ्ट सुरू आहे. मात्र, प्लॅटफॉर्म क्र. २ वरील लिफ्ट बंद आहे. त्याचा दररोज हजारो प्रवाशांना फटका बसावा लागतो. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना अन्य ठिकाणच्या लिफ्टकडे जावे लागते. या लिफ्टच्या दुरुस्तीकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय होत आहे, याकडे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी लक्ष वेधले आहे. या लिफ्टची तातडीने दुरुस्ती करुन दोन्ही लिफ्टची नित्यनेमाने देखभाल राखली जावी, यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी विनंती वाघुले यांनी आयुक्त डॉ. शर्मा यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.