मुंबई, दि. १६ :- बा पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने शेकडो किलोमीटर पायी चालून आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचलेल्या वारकरी माऊलींच्या तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत बा पांडुरंगाच्या चरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वंदन केले असून “राज्यात पाऊसपाणी चांगले होऊदे, शेतकऱ्यांच्या शेतात पिकांची, घरात धनधान्याची, दुधदुभत्याची सुबत्ता येऊ दे, राज्यातली मायमाऊली आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ दे, ,समाजातील एकजूट, बंधुत्वाची भावना कायम राहू दे महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी आम्हाला शक्ती दे,” असे साकडेही त्यांनी बा पांडुरंगाला घातले.
आषाढी एकादशीनिमित्ताने जनतेला दिलेल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणतात की, पांडुरंगाची भक्ती आणि पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची शेकडो वर्षांची अध्यात्मिक, भक्तीपरंपरा आहे. सर्व जाती, धर्म, पंथांच्या वारकरी माऊलींना एकत्र आणणारी, स्त्री-पुरुष समानतेचे दर्शन घडवणारी, महाराष्ट्राच्या मातीला एकता, समता, बंधुतेचा विचार देणारी, सांस्कृतिक, वैचारिकदृष्ट्या समृद्ध करणारी पांडुरंगभक्तीची, आषाढीवारीची पताका अशीच डौलाने उंच फडकत राहू दे, असेही त्यांनी म्हटले आहे.