कल्याण : पूर्वेतील गजबजलेल्या चिंचपाडा परिसरातील एका इमारतीत आज सकाळी आठ वाजता बिबटया शिरल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. मात्र तब्बल दहा तासाच्या थरारनाटयानंतर बिबटयाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं. त्यानंतर कल्याणकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
गुरुवारी सकाळी कल्याणच्या इमारतीत बिबटया शिरल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली होती. बिबटयाने तीन जणांवर हल्ला केल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरलं होतं. तर बिबटयाला पाहण्यासाठी कल्याणकरांनी गर्दीही केली हेाती. दरम्यान वनविभाग पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. सकाळी 10 वाजता बिबट्याने शिरकाव केल्यापासून वन विभागाने त्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते मात्र तो सतत ठिकाण बदलून पथकाला चकवा देत होता. यावेळी वनविभागाच्या कर्मचा-यावरही बिबटयाने हल्ला केला. त्यामुळे बिबटयाला बेशुध्दीचे इंजेक्शन देऊन त्याला जेरबंद करण्यात आले. अखेर 10 तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला जेरबंद रेस्क्यू टीमला यश आलं.