क्रॉस व्होटींगची शक्यता, दगाफटका टाळण्यासाठी पक्षांकडून खबरदारी  

मुंबई : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असल्याने ही निवडणूक चांगलीच चुरशीची बनली आहे. या निवडणुकीत महायुतीचे ९ तर महाविकास आघाडीचे ३ उमेदवार रिंगणात आहेत.  निवडणुकीत गुप्त मतदान प्रक्रिया असल्याने क्रॉस व्होटींग होण्याची शक्यता मोठया प्रमाणावर आहे. त्यामुळे निवडणुकीत कोणताही दगा फटका होऊ नये, यासाठी सर्वच पक्षांनी खबरदारी घेतल्याचं दिसून येतय. सर्वच राजकीय पक्षांनी सावध पवित्रा घेत आपल्या पक्षाच्या आमदारांची पंचतारांकीत हॉटेलमध्ये बडदास्त ठेवली आहे. या निवडणुकीत एक उमेदवाराचा पराभव होणार आहे. पण नेमका कुणाचा गेम होणार, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

येत्या दि, १२ जुलै रोजी ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी  भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित बोरखे, योगेश टिळेकर, सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली आहे तर शिवसेना शिंदे गटाकडून भावना गवळी कृपाल तुमाने यांना रिंगणात उतरवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे तर काँग्रेसकडून डॉ प्रज्ञा सातव हे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना पाठींबा दर्शविला आहे. तर शिवसेना उध्दव ठाकरे गटाकडून मिलींद नार्वेकर हे निवडणूक रिंगणात आहेत. 

राज्य विधानसभेच्या  एकूण जागा २८८ आहेत. पण, लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या काही आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे आता हे संख्याबळ २७४ वर आलं आहे. त्यामुळे विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी २३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे २३ ही या निवडणुकीतील मॅजिक फिगर आहे.

महायुतीचं संख्याबळ  

भाजपाचे  १०३ आमदार असून अपक्ष आणि मित्रपक्ष मिळून भाजपाचे १११ आमदार आहेत.  भाजपानं ५ जणांना उमेदवारी दिली असून सध्याचं संख्याबळ पाहात हे सर्व उमेदवार निवडून येतील असं मानलं जातंय. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे ३८ आमदार आहेत. त्यांना ७ अपक्ष आणि बच्चू कडू यांच्या पक्षाच्या २ अशा ९ आमदारांचा पाठिंबा आहे. शिवसेनेचं संख्याबळ ४७ आहे. या संख्याबळाच्या जोरावर काही धक्कादायक निकाल लागला नाही तर त्यांचे २ उमेदवार विजयी होऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ३९ आमदार आहेत. राष्ट्रवादीचे २ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादीला दोन्ही जागा जिंकण्यासाठी आणखी ७ आमदारांची गरज आहे.

 महाविकास आघाडीचं संख्याबळ..

काँग्रेसचे ३७ आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेसचा एक उमेदवार सहज विजयी होईल. त्यानंतर काँग्रेसकडं १४ मतं शिल्लक राहतील. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे  १३ आमदार आहेत. तर शेकापचा १ आमदार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा १ उमेदवार रिंगणात असून त्यांचे १५ आमदार आहेत. काँग्रेसच्या अतिरिक्त १४ मतांपैकी ८ मतं ठाकरे गटाच्या उमेदवाराला मिळण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास ठाकरे गटाचा उमेदवार सहज जिंकून येऊ शकतो. शरद पवार गटाला जयंत पाटलांसाठी १० मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. 

महायुतीचे एकूण २०२, महाविकास आघाडीचे ६६ आमदार आहेत.  एमआयएम – २, समाजवादी पार्टी – २, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी -१ आणि क्रांतीकारी शेतकरी पक्ष- १ असे ६ आमदार तटस्थ आहेत. हे आमदार या कुणाला मतदान करणार यावरही निवडणुकीचं चित्रं अवलंबून असेल.

 आमदारांची हॉटेलवारी 

विधानसभा निवडणुकीत कोणताही दगा फटका होऊ नये यासाठी सर्वच पक्षांनी खबरदारीचा उपाया म्हणून आमदारांसाठी खास हॉटेल बूक केले आहे.  आज दिवसभर पक्षांकडून बैठकांचे सत्र सुरू होते.  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने अंधेरीतील ललित हॉटेलमध्ये आमदारांना ठेवले आहे. भाजपने आपल्या आमदारांना ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये ठेवणार आहेत तर शिंदे गटाचे आमदार वांद्रयातील ताज लँड हॉटेलमध्ये असणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आयटीसी ग्रँड हयात हॉटेलमध्ये राहणार आहेत.  

******

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *