स्त्री आधार केंद्राच्या जागतिक महिला आयोगाच्या ११ मार्च रोजीच्या प्रस्तावित कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठीच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून केले मार्गदर्शन
पुणे, ता. २५ : “महिलांनी आपल्या अस्तिवाची लढाई खंबीरपणे लढली पाहिजे. त्यासाठी शक्ती आणि युक्तीचा खुबीने वापर केला पाहिजे. वैयक्तिक प्रश्नाऐवजी सार्वजनिक प्रश्नांवर भर दिला पाहिजे. सामहिक हितासाठी प्रयत्न व्हावेत. दारूबंदी, महिलांचे शेती आणि संपत्तीवर नाव लावणे, पिण्याचे पाणी, झोपडपट्टी निर्मूलन प्रश्न, महिला दिनानिमित्त महिला धोरणाच्याबाबत सरकारचा पाठपुरावा, असे अनेक प्रश्न हाती घेता येतील. येत्या ८ मार्च रोजी हे धोरण जाहीर होण्याबाबत राज्य सरकारने जाहीर केले आहे. यावर सकारात्मक काम होईल. सामाजिक काम करीत असताना महिलांची एकजूट होणे आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या महिलांना सोबत घेतले पाहिजे. प्रत्येकीच्या मनातील शंका दूर झाल्या की त्या आपल्या सोबत काम करण्यात नक्कीच सहभागी होतील. ये न समझो की हम हारे है … राख के नीचे अभी भी जल रहे अंगारे है …..” या ओळीनी विधान परिषदेच्या उप सभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज महिला चळवळीच्या वास्तवाची जाणीव करून दिली. महिलांच्या मनातील सामाजिक विषयांवर असलेल्या आशा – अपेक्षा अजूनही पूर्ण होण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
जागतिक महिला आयोगाच्या ११ मार्च रोजीच्या प्रस्तावित कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी स्त्री आधार केंद्राच्या वतीने आज पुण्यात आयोजित केलेल्या ‘ग्रामीण भागातील महिलांच्या अत्याचार विरोधी संघर्षात समाज आणि पोलिसांकडून अपेक्षा’ विषयावरील कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, ‘समाजकंटक वृत्तीना कायद्यांचा बडगा दाखवला पाहिजे. सरकार कोणाचेही असो, आपण त्या प्रश्नांवर काम केले पाहिजे. पती – पत्नी दोघांची नावे मालमत्तेवर लावण्याचा निर्णय, ज्येष्ठांना मदतीसाठीचे निर्णय, ज्येष्ठ नागरिक तक्रार प्राधिकरण कसे काम करते याबाबत समाजात माहिती मिळाली पाहिजे. पोलीस यंत्रणा काम करते मात्र काही वेळा सहकार्य मिळत नसल्यास वरिष्ठांकडे जाऊन काम केले पाहिजे. राजकारणात काम करीत असताना अनेक पातळ्यांवर काम केले जाते. गावांत अजूनही महिलांवर अत्याचार होत असल्याने त्या पूर्णपणे सुरक्षित नाहीत. अपहरण, मुलींची विक्री, शेतकरी आत्महत्या होत आहेत हे निश्चितच ठीक नाही. महिलांनी घराबाहेर पडणे प्रत्येक वेळी शक्य नसते. महिलांना आपल्या आयुष्यात अनेक अनुभव येत असतात. विधवा महिलांना तर अनेक प्रकारच्या अनुभवांना सामोरे जावे लागते. समाजात दुजाभाव नेहमी वाट्याला येतो. दुर्लक्षित राहावे लागते, उपहासाला सामोरे जावे लागते. हा अशा प्रकारचा अनुभव अमेरीकेतही लेखक असलेल्या महिलांना येत असतो. पुरुष वर्गाकडून काही वेळा महिलांना सार्वजनिक कार्यक्रमात बसायला खुर्ची लवकर देत नाहीत, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून महिलांनी कार्यक्रम आणि त्यातून होणाऱ्या कामावर लक्ष केंद्रित केले पाहिजे,’
दारूबंदीसाठी महिलांवर असलेले खटले मागे घेण्यासाठी सरकारने केलेले काम त्यांनी यावेळी त्यांनी सांगितले. भारताच्या माजी पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या काही आठवणी त्यांनी सांगितल्या. त्यांच्या पती कै. देवीसिंह शेखावत यांच्या निधनाबद्दल त्यांनी यावेळी श्रद्धांजली अर्पण केली. दिनांक ७ मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे यावेळी त्यांनी आवाहन केले. याचसोबत पुढील काळात महिलाविषयक काम करण्यासाठी तरुण मुलींचा सहभाग वाढावा यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत असे त्या म्हणाल्या.
कानपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या नीलम चतुर्वेदी, बारामती येथील स्त्री आधार केंद्राच्या कार्यकर्त्या अंजली वाघमारे, कोल्हापूर येथील लता शेवाळे, शिरूर तालुक्यात अनेक वर्षे स्त्री आधर केंद्राचे काम करणाऱ्या लहानू आबनावे यांनी आपले अनुभव सांगितले. त्यांनी ग्रामीण भागातील महिलांच्या बदलत्या समस्यांवर केलेल्या उपाययोजनाबाबत अनुभव मांडले. दारूबंदी, महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या एकत्रीकरणावर त्यांनी भर दिल्याचे सांगितले. महिलांच्या जीवनशैलीतही बरेचसे बदल झाल्याचे त्यांनी नमूद केले.
इचलकरंजी येथील सामाजिक कार्यकर्त्या दिलशाद मुजावर यांनी ग्रामीण भागातील महिलांना कायद्यांची माहिती मिळण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले. , नाशिक येथील जात पंचायतीच्या विषयावर अनेक वर्षे जनजागृती करणारे सामाजिक कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे यांनी ग्रामीण भागातील महिलांना येणारे अडथळे कसे पार केले याबाबत माहिती सांगितली. मृणालिनी कोठारी, सचिव अपर्णा पाठक उपस्थित होत्या.
आजच्या ऑरेंज – डे निमित्त आज स्त्री आधार केंद्राने आयोजित केलेल्या या विशेष कार्यक्रमाबाबत केंद्राच्या सचिव अपर्णा पाठक यांनी माहिती दिली. दिनांक ११ मार्च रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची माहिती आणि रूपरेषा सांगितली. तसेच या कार्यक्रमात अधिकाधिक लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.
जेहलम जोशी, मीना इनामदार, पुणे जिल्ह्याच्या महिला बाल कल्याण अधिकारी अश्विनी कांबळे, अंजना मोजर, उप सभापती कार्यालयाचे सचिव रवींद्र खेबुडकर, अनंत झेंडे, संपर्क संस्थेच्या मेधा कुलकर्णी, वनिता हजारे, लता शेवाळे, अश्विनी बारबोले, रुपाली नगरे, विजया शिंदे, ज्योती चांदेरे, सुनिता गोसावी यांनी दूरदर्शी प्रणालीद्वारे सहभाग घेतला. प्रास्ताविक केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी यांनी केले तर सूत्र संचालन अनिता शिंदे यांनी केले.
————-